Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विदेशी नागरिकांसाठी राज्य ठरतेय असुरक्षित

विदेशी नागरिकांसाठी राज्य ठरतेय असुरक्षित

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:40AM

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

देशाची आर्थिक राजधानी आणि विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मायानगरी मुंबईसह महाराष्ट्र राज्य विदेशी पर्यटकांसाठी असुरक्षित ठरत असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे अहवालातून समोर आली आहे. गेल्यावर्षी 38 विदेशी नागरिकासह मागील तीन वर्षात तब्बल 150 जणांना टार्गेट करण्यात आल्याच्या नोंदीने राज्य यात आघाडीवर पोहोचले असून त्यापाठोपाठ राजस्थान, तामिळनाडू आणि गोवा राज्याचा क्रमांक लागतो.

प्राचीन भारतीय संस्कृती, सण, उत्सव, समारंभ, राहणीमान यासोबतच पर्यटनस्थळे पाहण्यासाठी देशामध्ये येणार्‍या विदेशी पर्यटकांची संख्या अधिक आहे. मात्र याच परदेशी नागरिकांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा होत असून देशभरामध्ये 274 विदेशी पर्यटकांसोबत 92 विदेशी नागरिक अशा एकूण 366 विदेशींना टार्गेट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर पोहोचले असून 38 विदेशी नागरिकांना टार्गेट करण्यात आल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पर्यटन विकासाला चालन देण्याचा प्रयत्न करत असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चिंताजनक ठरू शकते. विदेशी नागरिकांच्या सुरक्षेबाबत वेळीच पावले उचचली गेली नाही तर राज्याची प्रतिमा धोक्यात येईल हे मात्र खरे.

भारत भ्रमणासाठी आलेल्या 104 विदेशी पर्यटकांसह 38 विदेशी नागरिक अशा एकूण 142 जणांना लुटल्याचे, तर 16 विदेशी पर्यटकांसह तीन विदेशी नागरिकांना मारहाण करून जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याहूनही धक्कादायक म्हणजे 30 तरुणी, महिला विदेशी पर्यटक आणि 3 नागरिक महिलांशी अश्‍लील चाळे करण्यात आले असून 19 जणींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर सहा विदेशी पर्यटकांसह एकूण 12 विदेशींची हत्या करण्यात आली आहे, ही विदेशी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब बनली आहे. विदेशींवर हल्ले, हत्या, बलात्कार, लुटमारीप्रकरणी देशभरातून तब्बल 192 आरोपींना अटक करण्यात आली. यातील 164 आरोपींवर खटलेदेखील दाखल करण्यात आले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे यातील फक्त 26 जणांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात पोलिसांना यश आले आहे. तर 21 आरोपींची पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून पोलिसांसाठी ही एक चिंतेची बाब आहे.