Thu, Mar 21, 2019 11:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यपालांचा संदेश जारी 

पावसाळी अधिवेशन प्रथमच नागपूरला

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन  4 जुलैपासून नागपूर येथेच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याबाबतचा संदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जारी केला आहे. पावसाळी अधिवेशन प्रथमच नागपूरला होत असून हिवाळी अधिवेशनाची नागपूरची परंपरा आता खंडित होणार आहे. 

यंदाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी घेतला होता. त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली होती. अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असली तरी ठिकाण मात्र अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नव्हते. शुक्रवारी नागपूर येथेच अधिवेशन होणार असल्याचे राज्यपालांकडून जाहीर करण्यात आले. 

सध्या मनोरा आमदार निवासाच्या कामामुळे आमदारांच्या निवासस्थानाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात विधानभवन परिसरात असुविधांचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळेही पावसाळी अधिवेशन नागपूरला हलविल्याची चर्चा आहे. मात्र, आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची परंपरा खंडित झाली आहे. पहिल्यांदाच पावसाळ्यात अधिवेशन होणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची व्यवस्थांची तारांबळ सुरू झाली आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या खालोखाल पावसाळी अधिवेशनाचे महत्त्व असते. या अधिवेशनात विरोधक सत्ताधार्‍यांवर तुटून पडत असतात. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सरकारची कसोटी लागत असते.  नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे असते. आतापर्यंत हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी प्रथमच पावसाळी अधिवेशन नागपूरला होणार असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.  एका अर्थाने हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे.

आत्तापर्यंत दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला होत होते. मात्र, केंद्र सरकार आर्थिक वर्ष हे कॅलेंडर वर्षाप्रमाणे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे करण्याच्या प्रयत्नात आहे. हा निर्णय केंद्राने घेतला तर राज्य सरकारचे डिसेंबरचे हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरू शकते. हे अधिवेशन मुंबईत घ्यावे लागणार असल्याने नागपूर येथे पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.