Sat, Nov 17, 2018 05:47



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अटकेसाठी तृप्ती देसाई यांचा मोर्चा

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अटकेसाठी तृप्ती देसाई यांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





मुंबई : विशेष प्रतिनिधी

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हेच आपले जैविक वडील असल्याचे सांगणार्‍या राज कोरडे या तरुणाला न्याय मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंगळवारी बोरीवली पोलीस उपायुक्त (डीसीपी) कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चाची दखल घेत पोलीस सहायक आयुक्त नंदकिशोर मोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांनी आमदार सुर्वे व त्यांचे व्यावसायिक भागीदार गणेश नायडू, विपुल दोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. 

राज कोरडे या तरुणाने आमदार सुर्वे हे आपले वडील असून डीएनए चाचणी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिका दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सुर्वे यांच्या सांगण्यावरुन त्यांचे व्यावसायिक  भागीदार नायडू यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून राजचे मुंबईहून सुरतला अपहरण केले होते. त्याची आई उज्ज्वला यांनी याविरोधात बोरिवली ठाण्यात धाव घेतली, पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. याबाबत गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे उज्ज्वला यांनी कैफियत मांडली असता डॉ. पाटील यांनी पोलिसांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. 

पण  बोरिवली पोलिसांनी ही तक्रार गणेशपुरी (जि. ठाणे) पोलिसांकडे वर्ग केली. तेथील पोलिसांनी सर्व जाबजबाब व तपास केला, पण अपहरणाची घटना बोरिवली पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याचे सांगत संबंधित फाईल मुंबई पोलिसांकडे पाठविली. मुंबई व ठाणे पोलिसांची चालढकल पाहता आपल्याला न्याय मिळणार नाही, असे वाटल्याने राज व त्याच्या आई उज्ज्वला यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी  देसाई यांनी बोरिवली पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. सदर प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल न केल्यास आमदार सुर्वे यांच्या घरासमोर ठिय्या तसेच नागपूर विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. देसाई यांची आक्रमक भूमिका पाहून सहायक पोलीस आयुक्त मोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांनी दोन दिवसात कारवाई करू, असे देसाई यांना लेखी आश्‍वासन दिले. या आंदोलनात मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, शिवा शेट्टी, गणेश यादव तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनेे सहभागी झाले होते.