Thu, Aug 22, 2019 04:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी?

विधान परिषदेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी?

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी मे महिन्यात निवडणुका होत आहेत. ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना युतीचे अजूनही तळ्यात मळ्यात सुरू आहे. शिवसेनेने आपल्या तीन जागांवरील उमेदवार जाहीर केले असून उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दोन्ही पक्षांनी दावा केल्याने तिढा निर्माण झाला आहे.    

आघाडीसाठी काँग्रेसने समसमान म्हणजे तीन-तीन जागांचा प्रस्ताव पुढे केला आहे. तर राष्ट्रवादीने विद्यमान तीन जागांबरोबरच चौथ्या जागेसाठी आग्रह धरला आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार असतानाही या मतदारसंघात आमची जादा ताकद असल्याचे सांगत राष्ट्रवादीने मतदारसंघावर दावा केला आहे. तर, परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्याने आघाडीचे घोडे अडले आहे. मात्र, चर्चेअंती तोडगा निघण्याची शक्यता असून त्यानंतर आघाडीची घोषणा होऊ शकते.  

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत असून 3 मे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक होत असलेल्या सहा जागांपैकी उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. तर नाशिक, परभणी-हिंगोली आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या तीन जागा राष्ट्रवादीकडेे आहेत. अमरावती व वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. या सहा मतदारसंघातील राजकीय स्थिती लक्षात घेता आघाडी करून लढल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल. त्यामुळे गतवेळच्या जागा वाटपाच्या सुत्रानुसार तीन-तीन जागा दोन्ही पक्षांनी लढवाव्यात, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. 

नाशिकमधून जयंत जाधव, परभणी-हिंगोलीतून बाबाजानी दुर्रानी आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिल तटकरे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. या तीन जागांबरोबरच उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघाची जागा देखील मिळावी, असा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे दिलीप देशमुख विद्यमान आमदार आहेत. तसेच येथील स्थानिक स्वराज्य संस्थांतील ताकद लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. 

Tags : Mumbai, mumbai news, Legislative Council, Congress NCP, Together,