Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जमाफीसाठी १ मार्चपासून पुन्हा मोहीम 

कर्जमाफीसाठी १ मार्चपासून पुन्हा मोहीम 

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 26 2018 12:59AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत अर्ज सादर करु न शकलेल्या शेतकर्‍यांना संधी देण्यासाठी 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान नव्याने अर्ज स्विकारण्यात येणार असून शिल्लक शेतकर्‍यांनाही लाभ देण्याचा निर्णय रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर सबंधीत शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे पडण्याच्या काळात जर कोणा जिल्हा बँकांनी शेतकर्‍यांकडून व्याज वसुल केले तर त्या जिल्हा बँका बरखास्त करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कर्जमाफी योजनेचा आढावा घेतानाच 1 मार्चपासून योजनेपासून वंचित राहीलेल्या शेतकर्‍यांसाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, कर्जमाफीसाठी सुमारे 67 लाख शेतकर्‍यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 54 लाख 72 हजार 311 खाती मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 46 लाख 35 हजार 648 खात्यांमध्ये पैसे टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये सुमारे 30 लाख निव्वळ कर्ज खाती असून 16 लाख 7 हजार खात्यांना प्रोत्साहन रक्कम देण्यात आली आहे.

सुमारे 13 हजार कोटी रुपये आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. एक रकमी कर्जफेड करणे आवश्यक आहे. मात्र, शेतकर्‍यांकडून त्यांची रक्कम भरली जात नसल्याने काही खात्यात पैसे जमा होउ शकले नाहीत. मात्र, बँकांनी त्यासाठी प्रयत्न चालविले असून अशा 30 हजार खात्यावरही लवकरच पैसे टाकले जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही खाती विवादास्पद असली तरी त्याची तपासणी सुरु असून एकही पात्र शेतकरी वंचित ठेवला जाणार नाही व शेवटचा लाभार्थी शिल्लक असेपर्यंत ही योजना राबविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्य सरकारने ही कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर आणि शेतकर्‍यांची खात्यावर परतफेडीची रक्कम टाकण्याच्या दरम्यानचे व्याज बँका मागत आहेत. चार पाच जिल्हा बँकांकडून शेतकर्‍यांकडून व्याजाची मागणी केली जात आहे. या बँका राजकीय हेतूने ही मागणी करीत आहेत. मात्र, जर त्यांनी शेतकर्‍यांकडून व्याज घेतले तर त्यांना बरखास्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. तशी नोटीस त्यांना बजावण्यात येईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.