Tue, Jul 16, 2019 01:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भायखळा जेलच्या ३०० महिला कैद्यांना अन्नविषबाधा

भायखळा जेलच्या ३०० महिला कैद्यांना अन्नविषबाधा

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 21 2018 1:04AMमुंबई : प्रतिनिधी

भायखळा येथील महिला कारागृहातील तब्बल 300 कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली. पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्यानंतर यातील 81 महिला कैद्यांना व चार महिन्यांच्या एका बालकाला शुक्रवारी सकाळी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असताना रुग्णालय प्रशासनाने मात्र अजून तशी पुष्टी दिलेली नाही. 48 तास रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार असून,  सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

या तुरुंगात 312 महिला आणि 399 पुरुष कैदी आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे नाश्ता केल्यानंतर काही महिला कैद्यांना पोटदुखी, उलट्या सुरू झाल्या. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन 300 वर गेली. यातील 81 महिला कैदी आणि एका चार महिन्याच्या बाळाला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने एकूण 100 बेडची सोय या रुग्णांसाठी केली असून 40 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. सध्या एका रुग्णामागे दोन डॉक्टर उपचार करत आहेत. सर्व कैद्यांना अ‍ॅन्टीबायोटीक देण्यात आल्याचे डॉ. वकार शेख यांनी सांगितले. कैद्यांच्या विविध तपासण्या केल्या असून, अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतरच घटनेचे नेमके कारण समजू शकेल असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले. 

पाच दिवसांपूर्वी तीन कैद्यांना उलट्या, जुलाब सुरु झाल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. एका कैद्यामध्ये कॉलराच्या आजारासारखी लक्षणे दिसू लागल्याने ही माहिती आरोग्य विभागाला कळविण्यात आली. गुरुवारी महापालिकेच्या ई वॉर्डच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तुरुंगात पाहणी केल्यानंतर तुरुंग कर्मचारी आणि कैद्याना गोळ्या दिल्या. रात्रीच्या जेवणापूर्वी काही कैद्यांनी त्या गोळ्या खाल्ल्यानंतर काही महिला कैद्याना त्रास सुरू झाला. 

तुरुंगातील डॉक्टरांनी काहींना तपासून जे. जे. ला पाठवले. मात्र शुक्रवारी सकाळी बॅरेक क्र.1  (महिला बॅरेक) मधील महिलांना त्रास जाणवू लागला. सात वाजता पहिली महिला उलटी होत असल्याची तक्रार घेऊन आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महिला त्रास होत असल्याच्या तक्रारी करू लागल्याचे तुरुंग महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले. तुरुंग प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे, असेही ते म्हणाले.

प्रतीक्षा वैद्यकीय अहवालाची

बाधा नेमकी कशामुळे झाली याचे मूळ शोधले जाणार आहे. कैद्यांच्या वैद्यकीय पॅथोलॉजी अहवालावरून या बाबींचा उलगडा होईलच. शिवाय तुरुंगातील पाण्याचे नमुने महापालिकेकडे तर अन्नाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवले आहेत. त्या तिन्ही अहवालानंतर बाधा कशामुळे झाली हे स्पष्ट होईल. अहवाल येईपर्यंत कैद्यांना बाटलीतील पाणी दिले जाणार आहे. - राजवर्धन सिन्हा, तुरुंग महानिरीक्ष