Sun, Nov 18, 2018 18:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा

भांडुपमध्ये विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:35AMभांडुप : वार्ताहर

भांडुपच्या सह्याद्री विद्यामंदिर शाळेत सातवीमध्ये शिकणार्‍या 16 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला माध्यान्न भोजनातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी घडली. गोवंडीनंतर, भांडुपला असा प्रकार समोर आल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. विद्यार्थी, शिक्षिका सुखरुप असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

पूर्वा शिर्के, भूमी चव्हाण, दिशा शिर्के, तनुजा पुजारी, मयुरी जाधव, भूमिका चव्हाण, प्रेरणा खापरे, वैष्णवी शिंदे, अर्थव उतेकर, अनन्या शिंदे, वैभव कांबळे, क्रिश नाईक, यजुवेश पांचाळ, सुमित डोंगरकर, आरती किसोळे, भानुशाली तांबे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

परिमंडळ सातचे उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी अग्रवाल रुग्णालयात जाऊन  घटनेचा आढावा घेतला.  वरण भाताचे भांडे भांडुप पोलिसांनी ताब्यात घेऊन लॅबमध्ये पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच हे प्रकरण उघडकीस येईल, असे अखिलेश कुमार सिंग यांनी सांगितले. आरोग्य समिती अध्यक्षा डॉ.अर्चना भालेराव, स्थानिक नगरसेविका दीपमाला बढे यांनी देखील रुग्णालयात विद्यार्थी, पालकांची भेट घेतली. सर्वांची तब्येत स्थिर असून उलटीचे नमुने परिक्षणासाठी पाठवल्याची माहिती डॉ.अर्चना भालेराव यांनी दिली. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि बचतगटांवर कारवाई करावी, शासनाने चांगले भोजन द्यावे, अशी मागणी संतप्त पालकांनी केली.