Mon, Jun 01, 2020 03:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वरळीपाठोपाठ दहिसर, गोरेगावसह 11 परिसर केले लॉकडाऊन

वरळीपाठोपाठ दहिसर, गोरेगावसह 11 परिसर केले लॉकडाऊन

Last Updated: Apr 01 2020 12:59AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

जेथे कोरोना, तो परिसर सील, असे धोरणच मुंबई महापालिकेने राबवले आहे. त्यानुसार आतापर्यंत 11 परिसरांवर बंदची मोहोर उमटवण्यात आली आहे. मुंबईतील भूमिपुत्रांच्या वस्त्यांतही म्हणजेच गावठाणांत रेडअलर्ट जारी केला गेला आहे. वरळी, दहिसर, गोरेगाव येथे कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

जगभरात कोरोनामुळेच बळी गेले आहेत. राज्यासह मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. झोपडपट्टी, गावठाणांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी वरळी, दहिसर आणि गोरेगावमधील बिंबीसार नगरातील गावठाण सील केले. मंगळवारी बॅलार्ड पिअरमधील एक सोसायटी सील केली. या ठिकाणी एक कोरोनाग्रस्त आढळून आला होता. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 32, तर सात निकटवर्तीय संपर्कात आले आहेत. त्यामुळे ही सोसायटी सील केल्याचे ‘ए’ वॉर्डमधील अधिकार्‍याने सांगितले. घाटकोपरमध्ये 3 रुग्ण सापल्यानंतर येथेही काही संपर्कात आले आहेत. त्यामुळे येथील जैन सोसायटी सील केली. तर जोगेश्वरी आणि विलेपार्ले येथील बिंद्रा कॉम्प्लेक्स, आझादवरील झोपडपट्टी, फ्रान्सिसवाडी आदी 3 परिसर बंद केले आहेत. कांदिवलीमध्ये चार ठिकाणी बंदीची कारवाई केल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

देशात लॉकडाऊन सुरू आहे. गर्दी करू नका, घरीच बसा, असे आवाहन करूनही लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही. अशातच झोपडपट्टी, गावठाण, चाळींमध्ये रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यावर वेळीच निर्बंध आणण्यासाठी संबंधित परिसर सील केले जात आहेत. 24 वॉर्डमध्ये ही कारवाई सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

वरळी कोळीवाडा दोन दिवस सील
वरळी कोळीवाडा परिसरात कोरोनाचे 8 रुग्ण आढळले. हा आकडा आणखी वाढण्याची भीती असल्यामुळे हा परिसर सील करण्यात आला असून, 60 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरळी कोळीवाडा मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपासून सील केला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेरदेखील पडता येत नाही. रहिवाशांना गरजेला दूध मिळणेही कठीण झाले आहे. मंगळवारी दुधाचा पुरवठा करण्यात आला असला, तरी तो अपुरा झाल्यामुळे पुरते हाल झाले आहेत. सिलिंडरची गाडीही आत सोडली जात नाहीत.

मुंबईत एकूण 34 कोळीवाडे, 185 गावठाणे आहेत. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून वरळी कोळीवाडा सील तसेच पश्चिम उपनगरातील काही गावठाणे सील करण्यात आली आहेत. रोजीरोटीवर याचा परिणाम होईल. मात्र कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला रोखण्यासाठी पालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे, असे मुंबई मच्छीमार संघटनेचे रमण पावसे यांनी सांगितले.