Tue, Apr 23, 2019 18:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईवर धुक्याची चादर !

मुंबईवर धुक्याची चादर !

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 12:25AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील वातावरण बदलले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. धुक्याची ही परिस्थिती अशीच दोन दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी आणि शनिवारी तापमान चांगलेच घसरुन सरासरी 20 अंशावर आले होते. त्यामुळे दिवसाही गारवा चांगलाच झोंबू लागला आहे. ओखी चक्रीवादळामुळे काढलेल्या छत्र्या पुन्हा एकदा कपाटात ठेवून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर आणि उबदार कपडे बाहेर काढावे लागले आहेत. राज्यात पुढील काही काळात थंडीचा जोर वाढणार आहे.      

मुंबईत आठवडाभरापूर्वी उच्चांक गाठणारा 35 अंशावरील तापमानाचा पारा आता 20 ते 22 अंशावर आला असून, वातावरणातील गारवा वाढला आहे. हिवाळ्यात सकाळी सकाळी वातावरणात धुके असतेच. मात्र सध्या उत्तर-पूर्वेकडून थंड हवा आणि पश्‍चिमेकडून येणारी उबदार हवा यांच्या मिश्रणामुळे सध्या मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्याचे साम्राज्य पसरत आहे. धुक्याची ही परिस्थिती अशीच दोन दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.