Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुक्यात गुदमरला मुंबईकरांचा श्‍वास

धुक्यात गुदमरला मुंबईकरांचा श्‍वास

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:15AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

दोन-तीन दिवसांपासून पसरणार्‍या धूरक्यामुळे मुंबईकरांच्या श्‍वास अक्षरश: गुदमरला आहे. वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढल्यामुळे जागोजागी धूरमिश्रित धुके दिसत आहे. हे धुरके मुंबईकरांच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. परिणामी, सध्या मुंबईसह उपनगरांमधील दवाखान्यांमध्ये श्वसनाचे आजार घेऊन येणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे.

दक्षिण भारतात ओखी चक्रीवादळामुळे सोमवारी-मंगळवारी पडलेल्या पावसानंतर हवामानातील बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. रविवारी हवेतील बाष्पाचे प्रमाण कुलाबा आणि सांताक्रूझ येथे 95 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. घसरते तापमान आणि समुद्राकडून येणारे बाष्प यामुळे हवेतील धूळ आणि धुराचे कण हवेत जमायला सुरुवात होते आणि यातूनच विरळ धुक्यांची निर्मिती होते. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने अशा प्रकारचे धूरके हिवाळ्याच्या दिवसात पाहायला मिळते. ही परिस्थिती अजून दोन दिवस अशीच राहणार आहे, असे भारतीय हवामान खात्याच्या शास्रज्ञ शोभा भुते यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे मुंबईतील वायुप्रदूषणाच्या गुणवत्तेचा स्तर चांगला या पातळीपर्यंत नोंदविण्यात आला होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईभर पसरलेल्या धुक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.