Mon, Jul 22, 2019 05:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पैसे एकाचे, तर फ्लॅट दुसर्‍याला

पैसे एकाचे, तर फ्लॅट दुसर्‍याला

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 12:59AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

एका ग्राहकाकडून पैसे घेऊन फ्लॅट परस्पर दुसर्‍याच व्यक्तिला विकल्याप्रकरणी गोरेगावातील अय्यप्पा कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या विकासकाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकासकाकडे 31 लाख रुपये भरून फसलेल्या ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

गोरेगाव पश्‍चिमेकडील शास्त्रीनगरात असलेल्या एस. एन. सर्वोदय इमारतीच्या तळमजल्यावर अय्यप्पा कंन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीचे कार्यालय आहे. नवीन फ्लॅटच्या शोधात असलेले ज्ञानप्रकाश शर्मा (59) हे फेब्रुवारी 2014 मध्ये या कार्यालयात पोहचले. बैठकीनंतर विकासकाने शर्मा यांना 68 लाख रुपयांमध्ये फ्लॅट देण्याचे कबूल केले. विकासकासोबत ठरलेल्या व्यवहारानुसार शर्मा यांनी धनादेशाद्वारे 10 लाख, तर 21 लाख 30 हजार रुपये रोखीने भरले.

आपल्यावर विश्‍वास ठेवा असे सांगत विकासकाने शर्मा यांच्यासोबत फ्लॅट खरेदीचे रजिस्ट्रेशन किंवा अन्य कोणतीही कागदपत्रे बनविली नाही. नावाजलेला विकासक असल्याने शर्मा यांनीही त्याच्यावर विश्‍वास ठेवला. पैसे भरून तीन वर्षे होत आली तरी फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने शर्मा यांनी चौकशी सुरु केली. चौकशीमध्ये विकासकाने शर्मा यांच्याकडून पैसे स्विकारण्यापूर्वीच हा फ्लॅट विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

शर्मा यांनी या विकासकाकडे पैशांची मागणी केली असता तो पैसे परत करण्यास टाळाटाळ करु लागला. अखेर शर्मा यांनी रविवारी सकाळी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून या विकासकाविरोधात तक्रार दिली. शर्मा यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून कपटीपणाने, अप्रामाणिकपणाने रक्कम घेऊन ती परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी भादंवी कलम 420 आणि मोफा कायद्याच्या कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.