होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भायखळ्यात २६ लाखांत  फ्लॅट देण्याच्या आमिषाने गंडा

भायखळ्यात २६ लाखांत  फ्लॅट देण्याच्या आमिषाने गंडा

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:26AMमुंबई : अवधूत खराडे

न्यु हिंद मिलमधील म्हाडा संकूलात असलेला फ्लॅट अवघ्या 26 लाखांत देण्याचे आमिष दाखवत म्हाडामधील दोन एजंटनी फ्लॅट मालकाकडून कागदपत्रे मिळवून 59 वर्षीय व्यक्‍तीला गंडा घातल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरुन फ्लॅटच्या मूळ मालकांसह आणखी एकाविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र यातून म्हाडा एजंटनी आपला हात काढून घेतल्याने पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

म्हाडातर्फे पाच वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये न्यू हिंद मिलमधील म्हाडा संकुलामध्ये सरुबाई आवटी यांचे पती मनाजी यांना फ्लॅट लागला. मात्र फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी सुरूवातीची रक्कम म्हाडाकडे भरण्यासाठी आवटी दाम्पत्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी सय्यद मेहंदी नावाच्या व्यक्तीकडून कर्ज घेऊन फ्लॅटचा ताबा घेतला. कर्जाच्या बदल्यामध्ये आवटी यांच्याकडून नमूद फ्लॅटची कागदपत्रे मेहंदी याने आपल्या नावावर हस्तांतरित करुन घेतली होती. दरम्यानच्या काळात 7 नोव्हेंबर 2013 रोजी मनाजी यांचा मृत्यू झाल्याने मेहंदी याचे कर्ज फेडणे सरुबाई यांना कठीण जाऊ लागले.

म्हाडातील एजंट मुस्ताक नाईक आणि कराड यांनी हीच संधी साधून सप्टेंबर 2014 मध्ये कायमस्वरुपी घराच्या शोधात असलेल्या दिलीप सावंत यांची सरुबाई यांचा मुलगा प्रकाश सोबत भेट घडवून आणली. मेहंदी याने पैशांसाठी तगादा लावल्याने आवटी कुटुंबिय फ्लॅट विकणार असल्याचे सांगून हा फ्लॅट अवघ्या 26 लाख 75 हजार रुपयांत विकण्याचा ठराव या एजंटनी करुन दिला. सावंत यांनी फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दाखवत 24 सप्टेंबर 2014 रोजी रोखीने 13 लाख 25 हजार रुपये दिले. तर उरलेले 13 लाख 50 हजार रुपये फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर देण्याचे ठरले.

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर 2017 मध्ये आवटे कुटुंबियांनी सावंत यांच्याविरोधात काँम्पीटट अँथोरटी आँफ कोकण डिव्हीजन, बांद्रा येथे तक्रार दाखल केली. सावंत यांच्याकडून 26 लाख 75 हजार रुपये घेतले नसून हा फ्लॅट अवघ्या 10 लाख रुपयांच्या डिपॉझिटवर भाडेतत्वावर दिला असल्याचे तक्रारीत नमूद केले.