होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील साडेपाच हजार शाळा शौचालयांविना !

राज्यातील साडेपाच हजार शाळा शौचालयांविना !

Published On: Apr 20 2018 1:24AM | Last Updated: Apr 20 2018 1:24AMमुंबई : पवन होन्याळकर

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी राज्यातील 1 लाख 10 हजार 315 शाळांपैकी 3 हजार 348 शाळांमध्ये मुलांची तर 2018 शाळांमध्ये मुलींची शौचालयेच नाहीत. तर असलेल्या शौचालयांपैकी तब्बल 7 हजार 60 शाळांमधील शौचालये वापराविना पडून आहेत. 3 हजार 653 शाळांमध्ये मुतारी नसल्याचे धक्कादायक वास्तव 2017-18 च्या यू-डायसवरुन समोर आले आहे.

पहिलीपासून सुरू होणार्‍या राज्यातील शाळांमधूनच मुला, मुलींच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासाची पायाभरणी केली जाते असे म्हटले जात असले तरी राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या अनेक शाळांमध्ये आरटीईप्रमाणे भौतिक सुविधांचा लाभ मिळत नसल्याचे डायस अहवालातून उघडकीस आले आहे. सरकारकडून अनेक योजना गावपातळीवर पोहोचल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी शाळांत मुलांना अध्ययन व अध्यापनावर परिणाम होणार्‍या अनेक भौतिक सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे. शौचालयाबरोबर वर्गखोल्या, शाळा इमारत, मुख्याध्यापकासाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याचे पाणी, पाकगृह, संरक्षक भिंत, क्रींडागण, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, स्वतंत्र शौचालय अशा अनेक सुविधा नसल्याचेही यू-डायसची आकडेवारी सांगते.

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या राज्यभरातील एक लाख 10 हजार 315 शाळांपैकी 3 हजार 348 शाळांमध्ये मुलांची तर 2018 शाळांमध्ये मुलींची शौचालये नाहीत. हे सर्वाधिक प्रमाण बीड आणि नांंदेड जिल्ह्यातील शाळांत आहे. तर वापरात नसलेल्या 7 हजार शाळांमध्ये अहमदनगर, जालना, पुणे, नागपूर या जिल्ह्यातील शाळांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अपंग मुलांसाठी तब्बल 28 हजार 680 शाळांत स्वतंत्र शौचालय नसल्याचे समोर आले आहे. तब्बल 18 हजार 123 शाळांना संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. यामध्ये सर्वाधिक प्रमाण जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षण भिंत नसल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 1854 शाळांना भिंत नाही. त्यापाठोपाठ नाशिकमधील 1802 शाळांना भिंत नसल्याचे दिसून येते.