Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील पाच नदी खोर्‍यांच्या जल आराखड्यास मान्यता

राज्यातील पाच नदी खोर्‍यांच्या जल आराखड्यास मान्यता

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:44AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी नद्या व महानदी खोर्‍यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील सर्वच खोर्‍यांच्या एकत्रित एकात्मिक जल आराखड्याचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक झाली. राज्यात गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी नद्या व महानदी या सहा खोर्‍यांचा अभ्यास करून स्वतंत्रपणे जल आराखडे तयार करण्यात आले. यापैकी गोदावरी खोर्‍याच्या जल आराखड्यास 30 नोव्हेंबर 2017 रोजी मान्यता देण्यात आली होती. तर उर्वरित पाच आराखड्यांचे सादरीकरण शुक्रवारी परिषदेच्या बैठकीत करण्यात आले. सर्व खोर्‍यांचा एकात्मिक जल आराखडा मंजूर होईपर्यंत प्रत्येक खोरे निहाय आराखड्याची अंमलबजावणी करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

जल आराखडे मंजूर झाल्यामुळे सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होईल, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. ते म्हणाले, राज्य जल परिषद व जलसंपदा विभागाने राज्यातील नदी खोर्‍यांचे आराखडे तयार करून ऐतिहासिक काम केले आहे. नदी खोर्‍यांचे आराखडे तयार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या नदी खोर्‍यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी नाविन्यपूर्ण पध्दती वापरण्याचे निर्देश दिले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव रा. वा. पानसे, मेरीचे महासंचालक आर.आर. पवार आदी यावेळी उपस्थित होते.