Thu, Aug 22, 2019 14:46



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रबाळे पोलीस ठाण्यातील पाच लाचखोर पोलीस निलंबित  

रबाळे पोलीस ठाण्यातील पाच लाचखोर पोलीस निलंबित  

Published On: May 17 2019 2:17AM | Last Updated: May 17 2019 2:00AM




बेलापूर : वार्ताहर

गाडीत अश्‍लील चाळे करीत असल्याचे निमित्त पुढे करत ही कारवाई टाळायची असेल तर तीन लाख रुपये द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी मागणी करणार्‍या रबाळे पोलीस ठाण्यातील पाच लाचखोर पोलीस कर्मचार्‍यांना कर्तव्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी बुधवार 15 मे रोजी  निलंबनाचा दणका दिला.

नवी मुंबई पोलीस ठाण्यांतर्गत रबाळे  पोलीस ठाण्यात  कार्यरत असलेले स्वप्नील तानाजी काशीद, सागर जगतसिंग ठाकूर, श्रीकांत नागनाथ गोकनूर, वैभव मोहन कुर्‍हाडे व नितीन दत्तू बराडे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत .याच पोलीस कर्मचार्‍यांनी कारवाईच्या नावाखाली 46 हजार रुपये घशात घातले आणि पुन्हा 40 हजार रुपये घेण्याची तयारी केली होती.मात्र तक्रारदार वेळीच सतर्क झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. 

या घटनेतील तक्रारदार व त्यांची महिला सहकारी एकाच कंपनीत काम करतात. ते मंगळवारी रात्री उशिरा कामावरून सुटल्याने दोघेही एकत्र कारने घरी जात होते. त्यांची कार पटनी  एक्सेंजर कंपनीसमोर ऐरोलीकडे जाणार्‍या मार्गावर थांबली होती. त्याचवेळी 

त्या ठिकाणी दोन पोलिसांनी त्यांच्याजवळ जात पोलिसी खाक्यात आरडाओरडा केला. त्यांच्या कृतीने तक्रारदार व महिला भयभीत झाल्याने  कार सुरु करून पळ काढला. त्यामुळे  मनात राग धरत पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना रात्री अडीचच्या सुमारास दिवागाव सर्कलजवळ अडवले. रागाच्या   भरात त्यांचे ओळखपत्र,गाडीची कागदपत्रे ताब्यात घेतली. तुम्ही गाडीत अश्‍लील वर्तन करत होता या कारणास्तव  कारवाई टाळायची असेेल तर तीन लाख रुपये द्या, असे  पोलीस  स्वरात दरडावले. तक्रारदारांकडे पुरेशा पैशांअभावी या महिलेने त्यांच्या खात्यात पाच हजार रुपये ट्रान्स्फर केले.त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांना एटीएममधून 46 हजार रुपये काढून दिले आणि आपली कागदपत्रांची मागणी केली.मात्र  त्यांनी ते न देता पुन्हा नव्याने 40 हजार रुपयांची मागणी केली. या गंभीर प्रकाराने तक्रारदार आणि महिला यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावर त्यांनी तत्काळ सर्व पोलीस कर्मचा़र्‍यांना ठाण्यात बोलवण्याचे फर्मान काढले. त्यानंतर ओळख परेड घेण्यात आली. त्यावेळी या घटनेतील पाच कर्तव्याचे विस्मरण झालेल्या कर्मचार्‍यांना ओळखले. यांच्यांकडील कागदपत्रे घेऊन ती तक्रारदाराच्या स्वाधीन केली. वरिष्ठ अधिकारी या नात्याने याची दखल घेत संबधित पोलिसांचे जबाब नोंदवून अहवाल परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्याकडे सादर करण्यात आला. परिणामी हा जबाब आयुक्तांकडे सादर झाला आणि  आयुक्तांनी लाच स्वीकारणे,लाचेची मागणी करून नैतिक अध:पतन अशा गंभीर वर्तनाचा ठपका ठेवत या पाच कायद्याच्या भक्षकांवर निलंबनाची  कारवाई  केली आहे. आयुक्तांच्या या दणक्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे.