होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच महिलांसह नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक

पाच महिलांसह नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या पाच महिलांसह नऊ बांगलादेशी नागरिकांना शुक्रवारी आय शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. बेरोजगारी आणि गरीबीला कंटाळून ते सर्वजण बांगलादेशातून मुंबईत कोलकातामार्गे आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्यांना येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर महिलांना भायखळा तर पुरुषांना आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले.

मनिरुल सिरामुल मंडोल, खादिजा मनिरुल मंडोल, बिलाल अबदर मंडोल, चाँदमोहम्मद कुन्दुस शेख, मेहरनिसा चाँदमोहम्मद शेख, रजीया बेगम शेख, रशीदा आलम शेख व इतर दोघांचा त्यात समावेश आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आय शाखेच्या अधिकार्‍यांनी अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली होती.

ही मोहीम सुरु असतानाच रे रोड, माझगाव आणि सीएसटी परिसरात काही बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती आय शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. यानंतर तिथे पोलिसांनी शोधमोहीम सुरु करुन पाच महिलांसह नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत असून त्यांना लवकरच त्यांच्या मायदेशात पाठविले जाणार आहे.