Thu, Sep 19, 2019 03:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी

यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी

Published On: May 20 2019 1:43AM | Last Updated: May 20 2019 1:36AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने एक जून ते 31 जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही,  असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने जारी केला आहे.

जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होते. त्यामुळे सागर किनार्‍यापासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

राज्याच्या क्षेत्राबाहेर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणार्‍या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण लागू राहील. मात्र, राज्यात पावसाळी मासेमारी बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल. 

बंदी कालावधीमध्ये जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकेच्या चलनवलनास पूर्णत: बंदी राहील. बदलत्या वातावरणामुळे मत्स्योत्पादन दरवर्षी घटत आहे त्यातच पावसाळ्यात प्रजनन काळात मासेमारी केल्यास मत्स्य दुष्काळात वाढ होण्याची शक्यता असते. 

त्यामुळे दरवर्षी जून, जुलैमध्ये मासेमारी बंद असते. ती 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात येते. परंतु काही ठिकाणी बंदीच्या काळातही यांत्रिक नौकेद्वारे मासेमारी सुरू असते. त्यामुळे मच्छिमार बांधव संतप्त होतात.