Thu, Feb 21, 2019 00:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवस्मारकाला एकही एनओसी मिळालेली नाही

शिवस्मारकाला एकही एनओसी मिळालेली नाही

Published On: Mar 06 2018 1:50AM | Last Updated: Mar 06 2018 12:59AMमुंबई : प्रतिनिधी 

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या उभारण्यात येणार्‍या स्मारकाला अद्याप विविध विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नसून याबाबत राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे, नरिमन पॉईंट येथील समुद्रात स्मारक उभारल्यास मुंबईतील कोळी समाजाचा व्यवसाय धोक्यात येण्याची भीती आहे, त्यामुळे त्याविरोधात कोळी महिला जलसमाधी घेतील, असा इशारा सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आला. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी हा इशारा दिला. 

शिवस्मारकाबाबत चुकीची माहिती दिल्याबाबत सरकारने सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवस्मारकाचे मॉडेल सौदीतील औरंगजेबाचे असल्याचा दावा करून त्यामुळे त्याला शिवसेनेचा विरोध असल्याचा दावा तांडेल यांनी केला. राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था सुधारण्याची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नरिमन पॉईंट येथील समुद्रात 42 एकर जमिनीवर बेट तयार करून स्मारक उभारल्यास मच्छीमार उद्ध्वस्त होईल, कोळी समाजाचा शिवस्मारकाला विरोेध नाही, मात्र त्याच्या प्रस्तावित जागेला विरोध असून हे स्मारक महालक्ष्मी रेसकोर्स येथील जमिनीवर उभारण्याची मागणी त्यांनी केली.

शिवस्मारकासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली नसल्याची माहिती आरटीआयमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे 3 हजार 600 कोटीचा निधी उपलब्ध नसताना नेमके कोणत्या आधारावर एल अ‍ॅन्ड टी कंपनीला स्मारकाचे काम देण्यात आले, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. शिवस्मारकाच्या नावावर राज्यातील जनतेची फसवणूक करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार विनायक मेटे यांचा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे तांडेल यांनी जाहीर केले.