Sun, Mar 24, 2019 04:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईला मासे गावले!

मुंबईला मासे गावले!

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 1:54AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय) चा मासेमारीसंबंधी सन 2017 चा वार्षिक अहवाल प्रकाशित झाला असून त्यातील मासेमारीच्या आकडेवारीनुसार सलग दुसर्‍या वर्षीही महाराष्ट्रात मासेमारी-उत्पादनात भरघोस वाढ झाल्याचे समोर आले आहे. उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई डॉकवर उतरवण्यात आलेल्या एकूण माशांमध्ये 54 टक्के इतकी भरघोस वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये कोळंबी 24.4 टक्के, राणीमासा 89 टक्के, बांगडा 95 टक्के, तर कटलफिशमध्ये 150 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. त्याशिवाय सुरमई, टुनासारखे महत्त्वाचे मासेही पाठीमागच्या वर्षाचा विचार करता मोठ्या प्रमाणात हाती लागले असले तरी खवय्यांच्या आवडीचा असलेल्या पापलेटच्या उत्पादनात मात्र कमालीची घट झाली आहे. 

मुंबई परिसरात 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये मत्सउत्पादनामध्ये मोठी वाढ झाली. 2016 मध्ये 2.92 लाख टन मासे सापडले होते. तर, 2017 मध्ये उत्पादन 3.91 लाख टनावर पोहोचल्याचे आढळून आले आहे. 

महाग असले तरी सिल्व्हर पापलेटना खवय्यांकडून मोठी मागणी असते. मात्र, त्याच्याच उत्पादनात 48 टक्के इतकी घट झाल्याचे समोर आले आहे. त्यापाठीमागे किशोरावस्थेत असलेल्या पापलेटची सातत्याने मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगण्यात येते. ही शिकार थांबली असती तर किशोरावस्थेत असलेल्या पापलेटांची वाढ होऊन त्यांचे प्रजोत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असते, असे जाणकारांचे मत आहे. त्याशिवाय गतवर्षी पूर्णतः वाढ न झालेल्या(किशोरावस्था) पापलेटची मोठ्या प्रमाणात शिकार झाली असली तरी त्यांना मार्केटमध्येही ते किशोर असल्याने दर मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. 

गतवर्षी मोठ्या प्रमाणात मासे मिळण्यापाठीमागे समुद्रात अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात होणार्‍या हालचाली कारणीभूत असल्याचेही अहवालात समोर आले आहे. त्याशिवाय सुमारे 61 दिवस समुद्रातील मासेमारी बंद असलेल्या काळात माशांच्या प्रजोत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली व परिणामी मत्सोत्पादनामद्येही वाढ झाल्याचे सांगण्यात येते. माशांच्या प्रजोत्पादन काळात परंपरागत मच्छिमार मासेमारी बंद ठेवतात, त्याचबरोबर पर्ससीन मासेमारीवरही या काळात राज्य सरकारने बंदी घालून त्याची कडक अंमलबजावणी केल्यानेही मत्स्योेत्पादनात मोठा फरक पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मत्स्योेत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी राज्य सरकारने काही कडक पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी होत आहे. राज्य सरकारने माशांचा आकार निश्‍चित केला पाहिजे, किशोरावस्थेत असलेल्या पापलेटसारख्या माशांची शिकार होऊ नये म्हणून वेळोवेळी धाड टाकून, तपासणी करून कारवाईही केली पाहिजे. अहवालात निश्‍चित मर्यादेच्या पुढे जाऊन समुद्रात मासेमारी होत असण्याबरोबरच परंपरागत मासेमारीमध्ये घट झाल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे. परंपरागत मासेमारीद्वारा गतवर्षी अवघे 1 टक्के मासे पकडण्यात आले होते.