Sat, Nov 17, 2018 10:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आधी आरक्षण जाहीर करा, नंतरच भरतीप्रक्रिया सुरू करा : विनोद पाटील

आधी आरक्षण जाहीर करा, नंतरच भरतीप्रक्रिया सुरू करा : विनोद पाटील

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:58AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी लवकरच महाभरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासाठीची सुरुवात करण्याच्या आधी मराठा आरक्षण जाहीर करा व नंतरच भरतीप्रक्रिया सुरू करा, अशी मागणी आर.आर.पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष व मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  

राज्यातील विविध विभागात महाभरती करण्याचे जाहीर झाले. या निर्णयामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना शासकीय सेवेची संधी मिळत आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. परंतु अनेक वर्षांपासून वंचित उपेक्षित मराठा तरुणांना या भरतीमध्ये संधी मिळण्याकरिता तत्काळ मराठा आरक्षण जाहीर करावे. अन्यथा आरक्षण मिळेपर्यंत सदर भरतीप्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. राज्यात अनेक वर्षांनंतर मोठी सरकारी नोकरभरती होत आहे. यामध्ये राज्यातला मोठा घटक असलेला मराठा तरुण डावलला गेला तर निश्‍चितच मोठी सामाजिक व आर्थिक दरी निर्माण होईल. तरी सर्व बाजूने सहानुभूतीपूर्वक विचार करून करून मराठा आरक्षण व नोकरभरतीबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.