मुंबई : प्रतिनिधी
एफवाय प्रवेशाची नामांकित महाविद्यालयातील पहिली गुणवत्ता यादी यंदाही नव्वदीपारच आहे. रुईया, मिठीबाई, पोद्दार आदी नामवंत कॉलेजचा विज्ञान आणि वाणिज्य शाखा कटऑफ नव्वदहून अधिक आहे. पदवी अभ्यासक्रमात प्रथम वर्ष प्रवेश गुणवत्तायादी मंगळवारी जाहीर झाली. वाणिज्यचा कट ऑफ एक ते दोन टक्क्यांनी वाढून 93 ते 95 टक्के झाला आहे. यंदा केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांसह बारावीला राज्य मंडळाकडून नव्वदी पार केलेल्यांची संख्याही जास्त आहे. त्याचा परिणाम कटऑफवर झाला आहे. मिठीबाई महाविद्यालयाचा पहिला कट ऑफ हा 95.5 पर्यंत बॅफची कटऑफ पोहचली आहे. तर वाणिज्य शाखेचा कटऑफ 94.2 आहे. कला शाखा यंदा 93.06 टक्के आहे.
यामुळेच नामांकित महाविद्यालयांच्या तब्बल 90 टक्के जागा पहिल्याच यादीत भरल्या जाणार आहेत. बायोकेमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, बीबीआय, बीएमएम आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाची कटऑफही 70 ते 90 टक्क्यांच्या घरात आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या या विद्यार्थ्यांना 20 ते 22 जून या कालावधीत फी भरावी लागणार आहे. दुसरी मेरिट लिस्ट 22 जून तर तिसरी मेरिट लिस्ट 27 जून रोजी जाहीर केली जाणार आहे.