Sat, Jul 20, 2019 21:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहिल्या खासगी गुप्तहेर रजनी पंडित गजाआड

पहिल्या खासगी गुप्तहेर रजनी पंडित गजाआड

Published On: Feb 02 2018 10:11PM | Last Updated: Feb 02 2018 10:11PMठाणे : दिलीप शिंदे 

भारतातील पहिली खासगी महिला गुप्तहेर रजनी शांताराम पंडित (55) यांना शुक्रवारी ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने दादर येथून अटक केली.  गेली 27 वर्ष खासगी गुप्तहेर एजन्सी चालविणार्‍या पंडित यांना दिल्लीतील कॉल डिटेल्स रेकॉडर्स अर्थात सीडीआर विकणार्‍या टोळीकडून बेकायदेशीरपणे सीडीआर विकत घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

विमा कंपन्यांना आणि खासगी गुप्तहेरांना  10 ते 12 हजार रुपयांच्या मोबदल्यात  सीडीआर विकणार्‍या टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला. वाशीतील ग्लोब डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मालकासह चार खासगी गुप्तहेरांना अटक केल्यानंतर या सीडीआर घोटाळ्याचे कनेक्शन दिल्लीपर्यंत पोहचले. याप्रकरणाच्या सखोल चौकशीमध्ये खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांनी देखील आरोपींकडून बेकायदेशीररित्या सीडीआर विकत घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे भारतीय दंड विधान संहिता कलम420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66, 72, 72 (अ) प्रमाणे पंडित यांच्या गुन्हा दाखल करून त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पथकाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. या कारवाईमुुळे खासगी गुप्तहेर विश्‍वात खळबळ उडाली आहे.

रजनी पंडित या मुंबई पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागात गुन्ह्यांचा उकल करण्याचा हातखंडा असलेल्या शांताराम पंडित या निवृत्त पोलिसाची कन्या आहेत. पालघरमध्ये जन्मलेल्या रजनी यांनी रुपारेल महाविद्यालयात मराठी या विषयातून पदवी घेतली. मराठीचा गाढा अभ्यास असलेल्या पंडित यांनी ‘फेस बिहाईड फेस’ आणि ‘मायाजाल’ ही दोन पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाविद्यालयीन  शिक्षण घेत असताना रजनी यांनी 1981 मध्ये पहिली केस सोडविली. त्यांच्याच वर्गातील एक मुलगा वेशा व्यवसायात गुंतला होता. त्याचा शोध घेऊन सेक्सरॅकेट उघडकीस आणले होते. गुप्तहेराचे कोणतेही अधिकृत शिक्षण न घेता मेहनत, चिकाटी याच्या बळावर रजनी यांनी या क्षेत्रात नाव कमविले. त्यासाठी वडिलांकडून गुन्ह्यांचा उकल करण्याचे गुण हेरून पुढे त्यांनी 1991 मध्ये  मुंबईतील माहिम येथे रजनी पंडित डिटेक्टीव्ह एजन्सी सुरू केली. पुढे ती रजनी इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या नावाने ही ओळखली जाऊ लागली. आजमितीला त्यांच्या कार्यालयात 30 खासगी गुप्तहेर काम करीत असून महिन्याकाठी 20 केसेस ते हाताळतात. 

खासगी पहिली महिला गुप्तहेर म्हणून रजनी पंडित यांनी केलेल्या कामगिरीची विविध संस्थांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, दिवंगत गोपीनाथ मुंडे असो वा दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन कौतुकाची थाप मारली होती. अशा या गुप्तहेर पंडित यांना लोकांच्या बेकायदेशीररित्या फोनचे सीडीआर विकत घेतल्याप्रकरणी कारागृहाची हवा खावी लागली आहे.