होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘आधी आम्हाला मरण द्या, नंतर घर-जमीन घ्या’

‘आधी आम्हाला मरण द्या, नंतर घर-जमीन घ्या’

Published On: Dec 01 2017 9:52AM | Last Updated: Dec 01 2017 9:52AM

बुकमार्क करा

भिवंडी ः वार्ताहर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासह मेगासिटीला ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे.

आता तर भिवंडी तालुक्यातील चिराडपाडा, पिसे येथील शेतकरी सिताराम ढमणे, कैलास ढमणे या शेतकर्यांनी राहत्या घरातच गळफास लावून ठेवला असून आधी आम्हाला मरण द्या आणि नंतरच घर, जमीन घ्या, असा खळबळजनक विरोध करत ‘समृद्धी’च्या नावाने गळफास घेण्याची तयारी केल्याने प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या निराश शेतकर्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने फलक लावून घात केल्याचा आरोपही केला आहे.

भिवंडी तालुक्यातील चिराडपाडा गावातील शेतकरी भातशेती, कडधान्य, मोगरा, आंबा, चिक्कू आदी पीक घेऊन आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र समृद्धी महामार्गात या गावातील तब्बल शंभर हेक्टर शेतजमीन आणि राहती घरेही जाणार असल्याने येथील शेतकर्यांवर बेघर आणि भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. या प्रश्नांसंबधी शासनाकडे, मंत्र्यांकडे पत्रव्यवहार व थेट भेटी घेऊनही शेतकर्यांची दखल घेत नसल्याचे पाहून संतप्त शेतकर्यांनी आपल्याच घरात गळफास लावून ठेवले आहेत. तसेच आधी आम्हाला मरण द्या आणि नंतर आमची घरे, जमिनी घ्या, असे फलक लावले आहेत.

विशेष म्हणजे चिराडपाडा या गावात कमी क्षेत्र असतानाही मुंबई, ठाणे महापालिकेच्या धरण प्रकल्पासाठी, एमएसईबी आणि टाटा पावर हायटेन्शन टॉवरसाठी तसेच गॅस पाईप लाईनसाठी अशी 5 वेळा या गावातील जमीन संपादन करण्यात आली आहे. मात्र त्याचा अद्यापही मोबदला मिळाला नसताना आता समृद्धी महामार्गासाठी आमचे पोट ज्या शेतीवर अवलंबून आहे, तसेच लाखो रुपये खर्चून बांधण्यात
आलेली घरे यांच्यावर वरवंटा फिरवला जाणार आहे. त्यामुळे आम्ही भूमिहीन आणि बेघर होणार असल्याने जगावं की मरावं अशी स्थिती निर्माण झाली आहे. लगतच्या सरकारी अथवा माळरानातून समृद्धी  महामार्ग वळवल्यास शेतकर्यांना दिलासा मिळणार असल्याचे शेतकर्याकडून सांगण्यात आले.