Mon, Jun 17, 2019 03:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळाचौकीत आगडोंब

काळाचौकीत आगडोंब

Published On: Mar 07 2018 2:09AM | Last Updated: Mar 07 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

काळाचौकी परिसरातील ईस्टर्न मेटल वर्क या कंपनीच्या गोदामाला मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कंपनी गोदामाच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर पसरली होती. गोदामात ज्वलनशील पदार्थ असल्याने आग अधिकच तीव्रतेने पसरत होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर काही तासांतच ही आग विझविण्यात यश आले व मोठा अनर्थ टळला. 

काळाचौकी परिसरातील दत्ताराम लाड मार्गावरील ईस्टर्न मेटल वर्क कंपनीच्या गोदामात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात अगरबत्तीची पावडर, तेलाचे डबे व तुपाचे डबे असल्याने आग झपाट्याने पसरत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीचे व धुराचे लोळ पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान 12 बंब, 12 पाण्याचे टँकरसह घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

गोदामाच्या बाजूला काही रहिवाशी इमारती आहेत. त्यामुळे ही आग या भागात पसरणार नाही, याची काळजी अग्निशमन दलाकडून घेण्यात आली. आगीच्या धुरामुळे आजूबाजूच्या सुमारे 200 हून अधिक नागरिकांना त्रास झाला. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ कारवाई करीत हा परिसर रिकामा करून आगीवर नियंत्रण मिळविले आहे.