Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे सिव्हिल रुग्णालयात पुन्हा आग

ठाणे सिव्हिल रुग्णालयात पुन्हा आग

Published On: Feb 11 2018 2:35AM | Last Updated: Feb 11 2018 2:24AMठाणे : प्रतिनिधी

ठाणे सिव्हील रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच याच रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना गेल्याच आठवड्यात अचानक आग लागली होती. अशा एकापाठोपाठ एक घडणार्‍या अनुचित घटनांमुळे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनावर टीकेची झोड उठत असताना शनिवारी पुन्हा सिव्हील हॉस्पिटल परिसरात आग लागल्याची घटना घडली. ठाणे सिव्हील हॉस्पिटलमधल्या ऑपरेशन थिएटरच्या इलेक्ट्रीक बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

ही आग आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाने वेळीच आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.  मागील महिनाभरापासून ठाण्याचे सिव्हिल रुग्णालय सतत घडणार्‍या अनुचित घटनांमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. बाळ चोरीला जाणे असो की सिव्हिलच्या आवारातील पाच गाड्या अचानक पेटण्याच्या घटना असो अशा घटनांमुळे हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेवर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. 

दरम्यान, ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतील तिसर्‍या माळ्यावर शनिवारी दुपारी 4.15 वाजेच्या सुमारड अचानक शॉर्टसर्किटने आग लागली.या आगीमुळे रुग्णालयात धुराचे लोट पसरल्याने एकच खळबळ उडाली. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील जुन्या इमारतीच्या तिसर्‍या माळ्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळ असलेल्या इलेक्ट्रिक बॉक्समध्ये शॉर्टसर्किटने ही आग लागली. 

सर्वत्र धूर पसरल्याने तिसर्‍या माळ्यावरील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यावेळी सुदैवाने रुग्णांवर शस्त्रक्रिया सुरु नव्हती. मात्र या सर्जिकल वॉर्डच्या बाजूलाच असलेल्या दोन बॉयलरपर्यंत ही आग पोहचली असता अनर्थ झाला असता, मात्र सुदैवाने अवघ्या अर्ध्या तासात अग्निशमन दलाच्या जवानांनी  या आगीवर नियंत्रण मिळवले.