Fri, Aug 23, 2019 15:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गिरगावचे कोठारी हाऊस खाक; एकाचा मृत्यू

गिरगावचे कोठारी हाऊस खाक; एकाचा मृत्यू

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईमध्ये आगीचे सत्र सुरूच असून रविवारी सायंकाळी गिरगावातील कोठारी हाऊसला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत कोठारी हाऊस खाक झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. गिरगावातील सेंटर प्लाझा परिसरात कोठारी हाऊस ही चार मजली इमारत आहे.  या इमारतीचा व्यावसायिक वापर केला जात असून इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास आग लागली. काही वेळातच आगीने तिसर्‍या मजल्यालाही आपल्या कवेत घेतले. घटनेची वर्दी लागताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र इमारतीच्या बांधकामात लाकड़ी सामनाचा वापर अधिक असल्याने बचाव पथके पोहोचेपर्यंत दोन्ही मजले जळून खाक झाले. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या आगीत अडकलेल्या 35 ते 40 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह रात्री 8 च्या सुमारास बाहेर काढण्यात आला. त्याची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये आणखीन काही कामगार अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बचावमोहीम सुरू असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.