Wed, May 22, 2019 06:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाडमध्ये प्रिव्ही कारखान्याला भीषण आग (Video)

महाडमध्ये प्रिव्ही कारखान्याला भीषण आग (Video)

Published On: Apr 26 2018 2:25PM | Last Updated: Apr 26 2018 4:36PM  महाड : पुढारी ऑनलाईन

 महाड औद्योगिक वसाहतीमधील  प्रिव्ही ऑर्गेनिक्स कंपनीमध्ये महाडच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भीषण आग लागली.  या अग्नि प्रलयामध्ये कंपनी परिसरातील आवारात असणाऱ्या दोनशे मोटारसायकल सह वीस कार आगीच्या भस्मस्थानी पडल्या आहेत.  प्राथमिक वृत्तानुसार, या दुर्घटनेत जीवितहानी नसली तरीही तीन जणांवर एमएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. या आगीचे भीषण रुप पाहता कंपनी परिसरातील पाच किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिल्याची माहिती प्रांताधिकारी श्री विठ्ठल इनामदार  यांनी दिली आहे.

 दरम्यान महाडमधील या आगीचे वृत्त समजताच आपले नियोजित सर्व दौरे रद्द करून रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने महाडला प्रयाण केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या सर्वात मोठ्या प्रिव्ही ऑर्गेनिक्स या सुगंधी द्रव्ये  करिता रसायने बनविणाऱ्या  कारखाना दोन युनिटमधील हायड्रोजन प्लांटला दुपारी एकच्या सुमारास स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीने गेल्या तीन तासांपासून रौद्ररूप धारण धारण केले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे पोलीस प्रशासनासह अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. याकामी स्थानिक नागरिकांसह कारखान्यातील अनेक कामगार, स्थानिक सेवा संस्थांचे कार्यकर्ते प्रयत्न करत असून स्थानिक प्रशासनाने सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे.

 प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी जेवणाच्या सुट्टीदरम्यान हायड्रोजन प्लांटमध्ये अचानक स्फोटाचे आवाज आल्यानंतर कामगारांमध्ये निर्माण झालेल्या घबराट नंतर सर्वांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आली. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू झालेले प्रयत्न हे व्यापक स्वरूपात करावे लागल्याने म्हाडे माडीची महापालिका खेड तसेच रोहा नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अथक प्रयत्न केले जात आहेत .

 पाणी व फोमच्या साह्याने आगीवर नियंत्रण अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर महामार्गावर सुरू असलेल्या लार्सन टुब्रो कंपनीच्या व्यवस्थापनाकडून तातडीने माती भरलेले डंपर घटनास्थळी बोलविण्यात आले यामुळे आगीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य होत असल्याचे  दिसून आले. याबाबतची माहिती शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे प्रांताधिकारी श्री ईनामदार यांनी स्पष्ट केले.

Tags :  mahad, Fire,  privi factory