Tue, Jan 22, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'मेट्रो ३'चे आठशे मीटरपर्यंतचे भुयारी काम पूर्ण(व्हिडिओ)

'मेट्रो ३'चे आठशे मीटरपर्यंतचे भुयारी काम पूर्ण(व्हिडिओ)

Published On: Mar 15 2018 7:45PM | Last Updated: Mar 15 2018 7:45PMमुंबई : योगेश जंगम

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला गती आली आहे. या मार्गाचे सात टप्प्यांमध्ये काम करण्यात येत असून, आत्तापर्यंत या संपूर्ण कामातील आठशे मीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो ३ मार्गाच्या भुयारीकरणासाठी आवश्यक असणार्‍या टनेल बोरिंग मशिन्स (टीबीएम) शहराच्या विविध भागांमध्ये दाखल झाल्या असून, अनेक मशिन्सद्वारे प्रत्यक्ष भुयारीकरणाच्या कामालाही सुरूवात झाली आहे.

सात टप्प्यांमध्ये एकूण १७ टीबीएम मशिन्सद्वारे भुयारीकरण करण्यात येणार असून, आतापर्यंत ६ टीबीएमच्या सहाय्याने काम सुरू आहे. लवकरच उर्वरीत टीबीएमही कार्यरत होतील आणि भुयारीकरणाच्या कामाचा वेग आणखी वाढेल, असे एमएमआरसीचे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले.

या मार्गिकेच्या भुयारी मार्गाचे खोदकाम प्रामुख्याने टीबीएमच्या सहायाने करण्यात येत असून, टीबीएम भूगर्भामध्ये 25-30 मीटर इतके खाली जाऊन खोदकाम करते. जमिनीखाली खडकाळ भागात कुशलतेने काम करणे ही टनेल बोअरिंग मशिनची खासियत आहे. आत्तापर्यंत झालेले काम संपूर्ण मार्गिकेमध्ये 6 लाख 32 हजार 716 क्युबिक मीटर जमिनीचे खोदकाम पूर्ण झाले आहे.

सातही स्थापत्य पॅकेजेससाठीची कास्टींग यार्डस पूर्णतः कार्यरत झालेली आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असणारी 71 पाईल बोरिंग मशिन्स, 88 खोदकाम करणार्‍या मशिन्स कामाच्या ठिकाणी कार्यरत आहेत. आठशे मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले असून, एकूण कामातील १८ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाच्या कंत्राटदारांचे सुमारे १ हजार ८०० कर्मचारी काम करत आहेत, तर ४३० सल्लागार कार्यरत आहेत यातील ३५ तज्ज्ञ आहेत.