Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता गुगलवर शोधा मुंबईतील शौचालये!

आता गुगलवर शोधा मुंबईतील शौचालये!

Published On: Mar 17 2018 1:49AM | Last Updated: Mar 17 2018 1:49AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत नेमके शौचालय कुठे आहे, हे समजत नाही. विशेषत: मुंबईबाहेरून येणार्‍या नागरिकांना शौचालय शोधण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईतील शौचालयाची माहिती गुगल नकाशावर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

मुंबईतील गर्दीत सार्वजनिक शौचालय शोधायचे झाले तर, ते शक्य होत नाही. त्यामुळे लघुशंकेसाठी एखाद्याला शौचालयात जायचे असेल तर, ते शोधण्यासाठी त्याचा बराच वेळ निघून जातो. यावर तोडगा म्हणून पालिकेने मुंबई शहर व उपनगरांतील शौचालयांची माहिती गुगलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर, एखाद्या शौचालयात पुरेशी सुविधा नसेल, तर अशा शौचालयाची तक्रार गुगलवर करणे शक्य होणार आहे. या योजनेसाठी केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयअंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.  

शौचालयांची माहिती जमा करण्याकरिता आवश्यक प्रशिक्षण क्वालिटी कौन्सिल यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेने शौचालयांची माहिती गुगल नकाशावर उपलब्ध करून दिल्यास स्वच्छ सर्वेक्षण 2018 मधील मूल्यमापनामध्ये पालिकेला गुण प्राप्त होतील, असे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले. 

दरम्यान यासाठी सुमारे 3 लाख 4 हजार रुपये खर्च येणार असून या खर्चात वाढ झाल्यास त्याची तरतूद करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Tags : mumbai, mumbai news, toilet, google Search,