Fri, Mar 22, 2019 06:24
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील कंपनीच्या फायनान्स मॅनेजर तरुणीची सहकार्‍यांकडूनच हत्या

अंधेरीतील कंपनीच्या फायनान्स मॅनेजर तरुणीची सहकार्‍यांकडूनच हत्या

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरी परिसरात असलेल्या बी ब्लंट सलून कंपनीतील फायनान्स मॅनेजर कीर्ती राजेंद्र व्यास या 28 वर्षांच्या तरुणीची तिच्या दोन सहकार्‍यांनीच हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून गुन्हे शाखेने सिद्धेश शांताराम ताम्हणकर आणि खुशी अजय सजवानी या दोघांना शुक्रवारी अटक केली. 

राजेंद्र व्यास हे ग्रँटरोड येथील एम. एस. अली रोडवरील सुपर सिनेमागृहाजवळील भारत नगरच्या 28/डी फ्लॅटमध्ये पत्नी सुरेखा आणि मुलगी कीर्तीसोबत राहतात. कीर्ती ही अंधेरी येथील बी ब्लंट या खासगी कंपनीत फायनान्स मॅनेजर म्हणून काम करीत होती. याच कंपनीत सिद्धेश हा अकाऊंट एक्झिक्युटीव्ह तर खुशी ही अकादमी मॅनेजर म्हणून काम करीत होती. 16 मार्चला सकाळी नऊ वाजता कीर्ती कामावर जाण्यासाठी घरातून निघाली. सकाळी साडेअकरा वाजता  आईने तिला वायफायचा पासवर्ड विचारण्यासाठी फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. ती कामात असावी म्हणून तिने नंतर तिला कॉल केला नाही. रात्री साडेनऊपर्यंत कीर्ती घरी न आल्याने पालकांनी कंपनीच्या प्रमुख वर्षा खानोलकर यांना फोन केला.  कीर्ती त्या दिवशी कामावरच आली नसल्याचे  वर्षां यांनी सांगितले.  प्रकार संशयास्पद वाटताच राजेंद्र व्यास यांनी डी. बी. मार्ग पोलिसांत मिसिंगची तक्रार केली होती. डी. बी. मार्ग पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी समांतर तपास सुरू केला होता. 

त्या दिवशी सिद्धेश आणि खुशी हे दोघेही ग्रँटरोड परिसरात कीर्तीसोबत होते. खुशीने तिच्या कारमधून कीर्तीला ग्रँटरोड रेल्वेस्थानकापर्यंत लिफ्ट दिल्याचे सांगितले. कीर्ती आणि खुशी पुढच्या तर सिद्धेश हा मागच्या सीटवर बसला होता. मात्र ते तिघेही कारमध्ये मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीपर्यंत दिसत असल्याचे सीसीटीव्हीचे फुटेज पाहिल्यानंतर उघडकीस आले. कीर्तीच्या दैनंदिन कामकाजाची आणि प्रवासाची माहिती घेतल्यांनतर सिद्धेश आणि खुशी यांच्या कामाबाबत कीर्ती  नाराज होती. तिने एका नोटीसद्वारे त्यांना कामात सुधारणा करा, नाहीतर सक्त कारवाई करण्यात येईल अशी समज दिली होती. या नोटीसची मुदत त्याच दिवशी संपत होती. या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणात त्यांचा सहभाग नसल्याचे सांगितले, मात्र सतत केलेल्या प्रश्‍नांच्या भडीमारानंतर त्यांनीच कीर्तीचे कट रचून अपहरण केले, तिची गळा आवळून हत्या करून हत्येचा पुरावा नष्ट केल्याचे स्पष्ट झाले. 

या दोघांकडून पोलिसांनी तीन मोबाईल, सिमकार्ड, गुन्ह्यांच्या दिवशी घातलेले कपडे आणि खुशीची कार जप्त केली आहे. दोघांनाही 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.