Thu, Aug 22, 2019 08:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर पालिका शाळांचे खासगीकरण

अखेर पालिका शाळांचे खासगीकरण

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिका शाळांच्या खासगीकरणाला सोमवारी शिक्षण समितीत शिक्कामोर्तब करण्यात आले. शिक्षण समितीने सुचवलेल्या सर्व शिफारशींचा समावेश करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ज्या शिक्षण संस्थेची उलाढाल वार्षिक 5 कोटी रुपये असेल, अशाच संस्थेला महापालिकेच्या शाळा चालवण्याची संधी मिळणार आहे. 

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी घसरत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत तब्बल 50 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यातील 35 शाळा खासगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत. या शाळा सार्वजनिक लोकसहभाग कार्यक्रमअंतर्गत खासगी संस्थांच्या शिक्षकांसह संपूर्ण शालेय व्यवस्थापन या धोरणानुसार खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा प्रस्ताव 21 नोव्हेंबर 2017 रोजी शिक्षण समितीत सादर करण्यात आला होता. पण समितीने तो प्रस्ताव फेरविचारासाठी शिक्षण विभागाकडे परत पाठवून दिला होता. त्यानंतर या प्रस्तावात काही सुधारणा करून तो फेब्रुवारी 2018 मध्ये पुन्हा शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला. शाळांच्या वाटप समितीमध्ये शिक्षण समिती अध्यक्षांचा समावेश केलेला नाही.  त्यामुळे यामध्ये सुधारणा करून तो परत आणला जावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ही मागणी प्रशासनाने मान्य केल्यामुळे अखेर सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.  

मूल्यांकन समिती आणि  गठीत समिती व शाळा वाटप समितीत शिक्षण समिती अध्यक्षांना स्थान देण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण प्रशासनाने समितीत केले. त्याशिवाय ज्या शिक्षण संस्थानची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयेपर्यंत असेल, अशाच शिक्षण संस्थांचा आणि कॉर्पोरेट संस्थांचा विचार करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने यावेळी सांगितले. या अंतर्गत निवड झालेल्या संस्थेच्या शाळा या आयजीएस, आयसीएसई, सीबीएसई व एसएससी या बोर्डाशी संलग्न असतील त्या बोर्डाच्या नियमानुसार माध्यम व अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. मात्र, एसएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांना महापालिकेच्या वतीने दिल्या जाणार्‍या 27 शालेय वस्तू दिल्या जातील. तसेच  इयत्ता 1 ली ते 10 च्या विद्यार्थ्यांना शालेय  पोषण आहार  महापालिकेच्या वतीने दिला जाईल.