होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर बेस्टचे ‘अघोषित’ खासगीकरण झालेच! 

अखेर बेस्टचे ‘अघोषित’ खासगीकरण झालेच! 

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 2:13AMमुंबई : प्रतिनिधी 

बेस्ट ताफ्यात खासगी बस सामील करून घ्या, तरच आर्थिक मदत करू.. असा धमकीवजा इशारा देणार्‍या पालिका प्रशासनासमोर लोटांगण घालत, अखेर बेस्ट प्रशासनाने दोन टप्प्यांत 450 खासगी मिनी बस ताफ्यात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. याला सोमवारी बेस्ट समितीतही ग्रीन सिग्नल दाखवण्यात आल्यामुळे बेस्टने खासगीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे उघड झाले आहे. 

बेस्टची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमाची तूट 880 कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने पालिकेकडे सुमारे 1 हजार कोटी रुपये अनुदानाची मागणी केली होती. पण हे अनुदान देण्यास नकार देत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कामगार भरती रोखण्यासह कामगारांचे भत्ते खंडित करणे, बस भाडेवाढ व बस ताफ्यात खाजगी बस दाखल करून घेण्याची अट घातली. पालिकेने सुचवलेल्या उपाययोजना अमलात आणल्या तरच, पालिका बेस्टला मदत करेल, असेही आयुक्तांनी महापालिका सभागृहात स्पष्ट केले होते.

अखेर आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट प्रशासनाने पालिका प्रशासनासमोर झुकत सर्व अटी मान्य करण्याचे वचन दिले. त्यानुसार अर्थसंकल्पात कामगार भत्ते गोठवण्यासह खासगी बस ताफ्यात सामील करून घेणे व बस भाडेवाढीचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव सोमवारी बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बेस्टचे खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचा आरोप केला.  खासगी बस घेण्यापलीकडे बेस्टकडे दुसरा पर्यायच नसल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी स्पष्ट केले. 

बेस्टने खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करताच  कामगार संघटनांनी जोरदार निषेध केला आहे. या खासगीकरणाच्या विरोधात बेस्ट कर्मचार्‍यांनी गुरुवार 15 फेब्रुवारीपासून स्वत:हून संपावर जावे, असे आवाहनच बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिली आहे. बेस्ट समितीने घेतलेला निर्णय बेस्ट उपक्रमासाठीच नाही तर कामगारांसाठी घातक असून, खासगी बसचा वाहक बेस्टचा असला तरी, चालक कंत्राटदाराचा असणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. तर चालकांची भरती रोखण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.