होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

Published On: Jan 17 2018 2:01AM | Last Updated: Jan 17 2018 12:46AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

महाराष्ट्रात नक्षली चळवळीच्या विचारसरणीचा प्रसार आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी आलेल्या 7 नक्षलवाद्यांच्या मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी मुसक्या आवळल्या. हे सातजण सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. 

यातील एकाला पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केली आहे. रमेश गौरुय्या गोलाल (वय 37) असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो गेल्या 12 वर्षांपासून डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरातील गायकवाड बिल्डिंगमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. मात्र, भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी घरमालक पंकज गायकवाड (वय 41) यांच्या  विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवरील नामदेव पाटील वाडीत राहणारे पंकज गायकवाड यांच्या मालकीची ही गायकवाड बिल्डींग आहे. भाडेकरूबद्दलची माहिती घरमालक गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक होते. मात्र, पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.