Sun, Mar 24, 2019 11:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिम्बज हॉलिडेज कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल

हिम्बज हॉलिडेज कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:41AMठाणे : प्रतिनिधी

आळंबी सारख्या तथाकथित कंपन्यांकडून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे सत्र ठाण्यात सुरूच आहे. क्रिप्टो करन्सी अर्थात आभासी चलन असलेल्या मनी ट्रेड कॉइनमध्ये (एमटीसी) पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात असल्याची बाब ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने केलेल्या कारवाईतून नुकतीच समोर आली असताना व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना तब्बल 72 लाखांचा गंडा एका तथाकथित कंपनीने घातल्याचे पुन्हा समोर आले आहे. आकर्षक व्याजाच्या प्रलोभनाला भुलून एजंट बनलेल्या महिलेसह इतर गुंतवणूकदारांना तब्बल 72 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घालणार्‍या हिम्बज हॉलिडेज प्रा. लि. कंपनीच्या पाच संचालकांविरोधात कोपरी पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

चारकोप, कांदिवली येथे राहणार्‍या माधुरी जाधव (43) यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून 2011 ते आजपर्यंत त्यांची व इतर गुंतवणूकदारांची तब्बल 72 लाख 32 हजार 810 रुपयांची फसवणूक झाली आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे हिम्बज हॉलीडेज प्रा. लि. नामक कंपनीने आलिशान कार्यालय थाटून कंपनीचे संचालक दिनेश बोरसे, दिनेश सकपाळ, संतोष काजरोलकर, आरिफ मर्चंट आणि कंपनीचा सल्लागार मोहन पाटील या भामट्यांनी हा गंडा घातला. सुरुवातीला मोफत सहलीला नेत या भामट्यांनी जाधव यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि नंतर विश्वासात घेऊन कंपनीचे प्रतिनिधी केले. 

जाधव यांनी सदर कंपनीत केलेल्या पहिल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला. तेव्हा कंपनीत जास्तीत जास्त पैसे गुंतवल्यास व्याजासह चांगला परतावा देण्याचे प्रलोभन सदर कंपनीच्या संचालकांनी त्यांना दाखवले. त्यानुसार जाधव यांनी स्वत:सह इतरही ग्राहकांचे पैसे कंपनीत गुंतवले. मात्र,काही कालावधीतच कंपनीच्या संचालकांनी कंपनीत घोटाळा झाल्याचा बहाणा करून रक्कम परत करण्यास असमर्थ असल्याचे भासवले. त्यानंतर कंपनीला अधिक गुंतवणूकदारांची गरज असून या भामट्यांनी गुंतवणूकदारांशी बैठकीत संवाद साधून आणखी गुंतवणूक केल्यास पूर्वीची गुंतवलेली रक्कम आणि आता गुंतवलेली रक्कम एकत्रित देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सर्वांनी पुन्हा रक्कम गुंतवली आणि फसवणूक करून घेतली.

संचालकांची धमकी

गुंतवणूक केलेली रक्कम देण्यासाठी तगादा लावला असता, कंपनीविरुद्ध पोलीस आणि न्यायालयात तक्रार करू नका, तुमचे पैसे व्याजासह देऊ, जर पोलिसात तक्रार केली तर, पैसे देणार नाही अशी धमकी देखील या कंपनीच्या संचालकांनी महिलेला दिली होती. रक्कम परत मिळत नसल्याने अखेर  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.