Thu, Apr 25, 2019 07:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा क्रांती मोर्चाचा पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

मराठा क्रांती मोर्चाचा पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 04 2018 1:40AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा समाजाचा संयम सुटेल आणि मराठा समाज पुन्हा रस्त्यावर येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी गुरुवारी राज्य सरकारला दिला.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी आपली ही नाराजी प्रकट केली. यावेळी 20 मागण्यांचे निवेदनही उपसमितीला सादर करण्यात आले.

मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतले असून, त्यासंदर्भातील आदेशही जारी केले आहेत. या निर्णयामध्ये जर काही त्रुटी असतील, तर त्या दूर केल्या जातील. अंमलबजावणीकडेही राज्य सरकार जातीने लक्ष देईल, असे आश्‍वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले. या बैठकीला राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार, दिलीप पाटील, संजीव भोर, विनोद पाटील, विनोद साबळे, आप्पासाहेब कुडेकर, इंद्रजित निंबाळकर आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी अद्याप जागा उपलब्ध करून दिल्या नाहीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा तरुणांना उद्योगधंद्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. त्याचे व्याज सरकार भरणार असले तरी लाभार्थ्याने आधी बँकेचे हप्ते भरल्यानंतर त्याला व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. राज्य सरकारने कर्जावरील व्याज परस्पर बँकांना द्यावे व लाभार्थ्यांना मुद्दलाची परतफेड करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी सुधारणा सुचविण्यात आली. ‘सारथी’ ही संस्था तत्काळ कार्यान्वित करावी. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तिचे उद्घाटन करावे, अशी मागणी मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी केली.

मराठा मोर्चाच्या समन्वयकांमध्ये कोणतीही फूट अथवा मतभेद नाहीत. मराठा क्रांती ही कोणाच्या नेतृत्वाखाली नाही, तर सामूहिक नेतृत्वाने उदयाला आली आहे. सर्वच समन्वयक आपापल्या पद्धतीने मागण्या मंजूर करण्यासाठी झटत आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सर्व समन्वयक बैठक घेऊन निर्णय घेतील, असे विनोद पाटील यांनी सांगितले.

Tags : Mumbai, Fifteen, day, ultimatum,  Maratha Kranti Morcha