Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चेंबरमध्ये गुदमरून बाप-लेकाचा मृत्यू

चेंबरमध्ये गुदमरून बाप-लेकाचा मृत्यू

Published On: Sep 01 2018 2:08AM | Last Updated: Sep 01 2018 1:43AMभिवंडी : वार्ताहर

रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या चेंबरमध्ये बसवलेली मोटार सुरू करण्यासाठी उतरलेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडी शहरातील अवचितपाडा या परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. चंद्रकांत राठोड (50, फातमानगर), रमेश राठोड (19) अशी या दोघांची नावे आहेत. दरम्यान, या दोघांचा मृत्यू ड्रेनेज लाईनमध्ये गुदमरून की विजेचा शॉक लागून झाला, हे स्पष्ट झालेले नाही.

अवचितपाडा या ठिकाणी इम्तियाज मोमीन यांचा दुग्ध व्यवसाय असून, त्यांच्या तबेल्यात सुमारे 100 म्हशी आहेत. येथील शेण एकत्रित करून तबेल्याची साफसफाई करण्याचे काम ठेका पद्धतीने चंद्रकांत राठोड हे मागील 18 वर्षांपासून  करीत होते. याबदल्यात त्यांना मजुरी मिळत होती. तबेल्यालगतच्या रस्त्यावर भिवंडी महापालिकेची मलनिस्सारण प्रकल्पाची सांडपाणी वाहून नेणारी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली असून ती अजूनही कार्यान्वित झालेली नाही. दरम्यान, या ड्रेनेज लाईनमध्ये जमा झालेले पाणी या तबेल्याच्या साफसफाईसाठी वापरले जात होते. त्यासाठी ड्रेनेज लाईनच्या मेनहोलमधून खाली सुमारे 35 फूट खोल मोटार लावून पाणी खेचले जात होते. 

चंद्रकांत व त्यांचा मुलगा रमेश नेहमीप्रमाणे या तबेल्यात शुक्रवारी पहाटे तबेला सफाईसाठी आले. मोटारमधून पाणी येत नसल्याने सुरुवातीला रमेश मेनहोलमध्ये मोटार सुरू करण्यासाठी उतरला. मात्र, पंधरा मिनिटे होऊनही तो बाहेर न आल्याने वडील चंद्रकांत हे मेनहोलमध्ये उतरले. परंतु तेही बाहेर न आल्याने तबेल्यात काम करणार्‍या इतर कामगारांनी मेनहोलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला असता बापलेक निपचित पडल्याचे आढळून आले. याची माहिती तबेला मालक इम्तियाज मोमीन यांना कळताच त्यांनी अग्निशामक दलास याची माहिती दिली. 

त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असता हे दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना बाहेर काढून तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांनी दिली. तर सायंकाळी उशिरा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांना याबाबत संपर्क साधला असता दोघांचाही मृत्यू गुदमरून झाला असून, रमेश यांचा मृत्यू गुदमरून हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.