भिवंडी : प्रतिनिधी
मुक्या, बहिर्या मुलीवर बाप आणि भावाने वारंवार अत्याचार केल्याने 15 वर्षीय मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्याची मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना रांजणोली येथे उघडकीस आली आहे. वडिल रमेश खरात (45) आणि भाऊ विकास खरात (19 ) असे बलात्कारी बाप,भावाची नांवे आहेत.
या दोघांनी 15 वर्षीय मुक्या, कर्णबधीर पीडित मुलीला काही महिन्यांपासून राहत्या घरात मारहाणीची धमकी देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला.सदर मुलगी सरवली येथील नाकोडा कर्णबधीर विद्यालयात सहावीत शिकत असल्याने वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे आढळून आले.शाळा प्रशासनाने तिच्याकडे चौकशी केली असता बाप व भावानेच तिच्याशी मानवतेला काळीमा फासणारे दुष्कृत्य केल्याचे समोर आले. मुलीच्या तक्रारीवरून कोनगांव पोलीस ठाण्यात वडिल रमेश व भाऊ विकास या दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
एपीआय दादोसा एडके यांनी अत्याचारी भाऊ विकास खरात याला रविवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. फरार बापाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.