Tue, Feb 18, 2020 00:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

Published On: Sep 22 2019 2:10PM | Last Updated: Sep 22 2019 8:10PM

फादर फ्रान्सिस दिब्रिटोउस्मानाबाद : प्रतिनिधी 

जानेवारी 2020 मध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यीक फादर फ्रान्सिन दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. याबरोबरच जानेवारीमध्ये 10, 11 आणि 12 तारखेला संमेलन घेणार असल्याचेही साहित्य महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.  अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उस्मानाबाद येथील बैठकीनंतर साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे आदींची उपस्थिती होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्या आली. या बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील, 92 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे, महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, मिलींद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनिता राजेपवार, विलास मानेकर, प्रदीप दाते, गजानन नारे,उषा तांबे, उज्वला मेहेंदळे, प्रतिभा सराफ, भालचंद्र शिंदे, सुहास बेलेकर आणि प्रसाद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महामंडळाच्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यीक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड केली आहे. बैठकीत महामंडळाच्या विविध घटक व संलग्न संस्थांकडून संमेलनाध्यक्ष पदासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाशिवाय प्रवीण दवणे, प्रतिभा रानडे, भारत सासणे या नावांची शिफारस करण्यात आली होती. दिब्रिटो यांच्या नावावर बैठकीतील सर्वांनी एकमताने शिक्कामोर्तब केले.  याच बैठकीत ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे आणि महाराष्ट्रातून चरितार्थासाठी दिल्ली येथे जाऊन हिंदी साहित्यविश्‍वात नावलौकिक प्राप्त केलेले अमरावती येथील लक्ष्मण नथ्थुजी शिरभाते यांचा जाहीर सत्कार करुन साहित्य संमेलनात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या संमेलनाच्या तारखा निश्‍चित करण्यात आला असून संमेलन 10, 11 आणि 12 जानेवारी 2020 रोजी उस्मानाबाद येथे साजरे होणार आहे. संमेलनात येणार्‍या ग्रंथविक्रेत्यांसाठी 350 सुसज्ज गाळे तयार करण्यात येणार आहेत. प्रतिगाळा 6 हजार 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून ग्रंथविक्रेत्यांना त्यापोटी आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तीन दिवस संमेलनासाठी राज्य आणि देशभरातून येणार्‍या प्रतिनिधींकरिता तीन दिवसांचे भोजन, निवास आणि साहित्य संमेलनाचे किट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यासाठी 3 हजार रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या संमेलनातील विविध कार्यक्रमांचा आराखडा देखील या बैठकीत तयार करण्यात आला आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे स्थानिक निमंत्रक संस्थेने निश्‍चित करावे. त्यांचे नाव महामंडळाच्या अध्यक्षांना कळवावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.