Mon, Aug 19, 2019 18:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात 

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात 

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:02AMमाणगाव : कमलाकर होवाळ 

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव उसरघर नजीक दोन कंटेनरमध्ये भीषण टक्कर होवून झालेल्या अपघातात कंटेनरनी पेट घेतल्याने उसळलेल्या आगडोंबामध्ये पाच जण जागीच ठार झाले. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग पहाटे जवळपास तब्बल दोन तास ठप्प झाला होता. 

दोन कंटेनरमधील चालक व क्‍लिनर अशा चौघांचा प्रथम होरपळून मृत्यू झाला. तर या अपघातग्रस्त कंटेनर्सना पाठीमागून येणार्‍या मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वारही जागीच ठार झाला. गुरुवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. 

महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्यात समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून अग्निशामन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.  गुरुवारी 8 मार्च  रोजी पहाटे 5.15 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून माणगांवकडून महाडच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने  (क्र. एच.आर. 74 ए 2899) उसरघर गावच्या हद्दीत आल्यानंतर समोरून महाड बाजूकडून माणगांवच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर ( क्र. आर.जे. 09 जी.बी. 8292)ला  जोरात  धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही ट्रकच्या केबिन्स एकमेकांत घुसून आग लागली. या आगीत दोन्ही ट्रकचे चालक व क्लिनर अशा चार जणांचा जळून अक्षरश कोळसा झाला. त्यांची ओळख पटणे अवघड होऊन बसले आहे. अपघात स्थळीचे दृश्य अतिशय भयावह असेच होते. 

गोरेगांव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी दत्ता नलावडे, गोरेगांव पोलिसठाण्याचे  पो.नि. विक्रम जगताप यांच्यासह वाहतुकशाखेच्या कर्मचार्‍यांंनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून दूर करीत वाहतूक सुरळीत केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माणगांव उपजिल्हारुग्णालयात नेण्यात आले.  या अपघाताची नोद गोरेगांव पोलिसठाण्यात   करण्यात आली असून अधिक तपास पो.स.ई. एस.टी. जाधव करीत आहेत.