Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फॅट कमी असलेल्या दुधाच्या दरात होणार कपात

फॅट कमी असलेल्या दुधाच्या दरात होणार कपात

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 1:05AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील शेतकर्‍यांना दूध दर मिळण्यासाठी सरकारने दूध संघांना 5 रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केले असले तरी आता दुधाची गुणवत्ता टिकावी, या कारणासाठी कमी फॅट (एसएनएफ) असलेल्या दुधाच्या दरात कपात करण्याचा प्रस्ताव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने आणला आहे. या प्रस्तावानुसार आता 8.4 एसएनएफ असलेल्या दुधाच्या दरात 1 रुपया तर  8.3 एसएनएफपेक्षा कमी गुणवत्ता असलेल्या दुधाला प्रतिलिटर 50 पैसे दर कपात करण्यात येणार आहे.

एकीकडे सरकारने शेतकर्‍यांना दूध दरवाढ केल्याचे दाखवले असले तरी दुसर्‍या बाजूने सरकारने थेट शेतकर्‍यांच्याच खिशात हात घालून 5 रुपये कमी करण्याचा डाव खेळला आहे.राज्यात उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून गायीच्या दुधाला 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ व त्यापेक्षा अधिक गुणवत्तेच्या  दूध रुपांतरणास 5 रुपये अनुदान देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार सहकारी व खासगी दूध संघांनी शेतकर्‍यांना 3.2 टक्के फॅट गुणवत्तेच्या दुधाला 24 रुपये 10 पैसे दर देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये 19 रुपये 10 पैसे रुपये दूध संस्थेचे तर 5 रुपये शासन अनुदानाचा समावेश असणार आहे. 

3.3 टक्के फॅटच्या दुधास 24 रुपये 40 पैसे (19 रुपये 40 पैसे व 5 रुपये अनुदान), 3.4 टक्के फॅटच्या दुधास 24 रुपये 70 पैसे व (19 रुपये 70 पैसे व 5 रुपये अनुदान) आणि 3.5 टक्के फॅट गुणवत्तेच्या दुधास 25 रुपये (20 रुपये व 5 रुपये अनुदान) प्रतिलिटर असा दर दूध उत्पादकांना देणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले होते. 

दूध प्रकिया संघांकडील पिशवीबंद दुधाला हे अनुदान असणार नाही. हे अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस लागू राहील. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणार्‍या संघांनी दूध उत्पादक शेतकर्‍यांना 1 ऑगस्ट 2018 पासून 25 रुपये प्रतिलिटर खरेदी दर दिला जात असल्याचे हमीपत्र संबंधित प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकार्‍यांना  देणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच सरकारने दरकपातीचा नवा प्रस्ताव आणल्याचे समजते. याबाबत लवकरच शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.