Fri, Sep 21, 2018 23:21



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनेच्या बाळराजेंच्या मित्रांना वाचवण्यासाठी कारवाईचा फार्स

‘सेनेच्या बाळराजेंच्या मित्रांना वाचवण्यासाठी कारवाई’

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 7:46AM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीवरून आता जोरदार राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. पालिकेने कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरू झालेली कारवाई हा केवळ फार्स आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणार्‍या हॉटेल्सचे मालक हे बाळराजेंचे जिवलग मित्र आहेत. त्यांना या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी अधिकार्‍यांचे निलंबन आणि बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तोंडदेखली कारवाई सुरू आहे, असा आरोप करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

विखे पाटील यांनी शनिवारी कमला मिल कंपाऊंडमधील घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर त्यांनी भाजप व शिवसेनेवर जोरदार शरसंधान केले.मोजेस ब्रिस्ट्रो व वन अबोव्ह या दोन्ही हॉटेल्समध्ये बेकायदा व असुरक्षित बांधकाम झाल्याची पूर्ण माहिती महानगरपालिकेला होती. परंतु 14 निरपराध मुंबईकरांचे बळी जाईस्तोवर महानगरपालिका प्रशासनाने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. कारण या हॉटेल्सच्या मालकांचे धागेदोरे थेट भाजप आणि शिवसेनेच्या वजनदार नेत्यांशी जुळले असल्याची जाणीव महानगरपालिकेला होती. त्यामुळेच या हॉटेल्सविरुद्द कारवाई झाली नाही, असे सांगून विखे-पाटील यांनी मोजेस ब्रिस्टो या हॉटेलचा ऑगस्ट महिन्यातील तपासणी अहवाल प्रसारमाध्यमांसमोर सादर केला.

कमला मिल कंपाऊंडच्या आगीत 14 जण गेले आणि लगेच पाच अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले. बाकी ठिकाणी कारवाई झाली नाही आणि येथे कारवाई झाली, हाच हे प्रकरण दडपले जाणार असल्याचा मोठा पुरावा आहे. या पाच अधिकार्‍यांचे निलंबन दाखवून यातील मूळ सुत्रधारांना वाचवण्याच्या दिशेने सरकारची पावले पडत आहेत.

मुंबई महापालिकेत पहारेकर्‍याची भूमिका बजावणार्‍या भाजपने आता जागे झाले पाहिजे, असा टोला लगावत त्यांनी राज्याची सत्ता टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी करु नये असे ते म्हणाले. मुंबई महापालिकेत रुफ टॉपवर बसून नाईट लाईफच्या गप्पा करणार्‍यांना आता जमिनीवर आणण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणाले.

कमला मिलसारखीच परिस्थिती टोडी मिल, रघुवंशी मिल आणि फिनिक्स मिलची आहे. या सर्व मिलच्या जागेवर अनधिकृत आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असलेले हॉटेल्स उभे झाले आहेत. कमला मिलमध्येच स्मॅश नावाचा पब आणि गेमींग झोन आहे तेही अनधिकृत, नियमबाह्य आहे, असे ते म्हणाले. यावेळी विखे पाटील यांच्यासोबत मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम, आमदार भाई जगताप, माजी आमदार चरणसिंग सप्रा आदी नेते उपस्थित होते.