Wed, Jul 17, 2019 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या मदतीला सिध्दिविनायक

आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या मदतीला सिध्दिविनायक

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न ज्वलंत बनलेला असतानाच त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत सिध्दिविनायक ट्रस्टकडून आता  आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला जाणार असल्याची  माहिती श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

श्रीसिध्दिविनायक मंदिराच्या नवीन व्यवस्थापन समितीच्या कारभारास सहा महिने झाले. याकाळत हाती घेण्यात आलेल्या नव्या योजना व कामांची माहिती अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्‍वस्त गोपाळ दळवी आदी उपस्थित होते. 

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी केजी टू पीजी म्हणजेच प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचा खर्च यापुढे सिध्दिविनायक न्यासमार्फत करण्यात येणार आहे.  गडचिरोली येथील प्रियांका गवळी या मुलीच्या बीडीएसच्या अभ्यासक्रमासाठीचे पहिल्या सत्राचे शुल्क नुकतेच न्यासामार्फ भरून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शैक्षणिक सुविधांबरोबर गरिबांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबईत किंवा राज्यात श्रीसिध्दिविनायक न्यास संचालित सुसज्ज रूग्णालय उभारण्याचा विचार असल्याचे बांदेकर यांनी सांगितले. 

जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी डायलिसिस सुविधा सिध्दिविनायक मंदिरातील डायलिसिस सेंटरमध्ये मागिल सहा महिन्यात 6 हजार रुग्णांना सुविधा उपलब्द करून देण्यात आली. 

डायलिसिसची वाढती गरज लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्हा रूग्णालयांच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी 102 डायलिसिस मशिन्स देण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीने घेतला आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटर देखील उभारण्यात येणार आहे. ज्या रूग्णांना औषधोपचाराचा खर्च परवडत नाही अशांना न्यासातर्फे आर्थिक मदत देण्यात येते. पुर्वी यासाठी महिना लागायचा आता पाच दिवसांत धनादेश मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
जलयुक्तच्या कामाची पाहणी करूनच पैसे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार या योजनेसाठी 34 जिल्हयांना 74 कोटी 75 लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. हा निधी त्या कामावरच खर्च केला जात असल्याची पाहणी करूनच पैसे देण्यात येत आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्हयांतील मदतकार्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी  जिल्हाधिकार्‍यांकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाम फाऊंडेशनला तीन जेसीबी मशीन आणि जलशुद्धीकरण यंत्राचा पुरवठा लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.