Tue, Apr 23, 2019 09:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोर्चेकर्‍यांच्याजखमांवर फुंकर मुंबईची!

मोर्चेकर्‍यांच्याजखमांवर फुंकर मुंबईची!

Published On: Mar 13 2018 2:19AM | Last Updated: Mar 13 2018 2:19AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मोर्चेकर्‍यांच्या पायांना भेगा पडल्याचे, रक्ताळलेल्या पायाचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होताच मुंबई, ठाणे, शहापूर येथून डॉक्टर धावून आले. ठाणे सरकारी रुग्णालय, सर जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आझाद मैदानातच अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ओपीडी सुरू केली. आझाद मैदानावर चेकअप कॅम्प्स उघडून मोर्चेकर्‍यांच्या जखमांवर औषधोपचाराची फुंकर घातली. 

 200 किलोमीटरचे अंतर पायी चालताना डोक्यावर आग ओकणारा सूर्य, अंगाची लाहीलाही करणारी उष्णता आणि अनवाणी चालणार्‍यांच्या पायाला बसणारे असंख्य चटके. या सर्व संकटांची पर्वा न करता  बळीराजा मुंबईत आझाद मैदानावर धडकला. अनेकांच्या पायात काटे रुतल्याने पाय रक्तबंबाळ झाले होते.  पायांना फोड आले होते. 

सर जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे म्हणाले, दिवसभरात 250 हून अधिक रुग्णांवर आमच्या टीमने उपचार केले. पायाला भेगा पडल्याचे सर्वाधिक रुग्ण तपासण्यात आले.अनेकांना डिहायड्रेशनचाही त्रास झाला. मागील सहा दिवसांपासून चालून चालून पायदुखी, अंगदुखी आणि ताप असणार्‍याही अनेक रुग्णांची तपासणी केली. कडक उन्हामुळे आत्तापर्यंत 4 रुग्णांना चक्कर आली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
शिवसैनिक डॉक्टरांची टीम 

 80 टक्के समाजसेवा व 20 टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनाला जागत शिवसैनिक असणारे डॉ. प्रमोद दाभाडे, पृथ्वीराज शिंगरे, रावसाहेब पाटील यांनी मोर्चेकर्‍यांची सोमय्या मैदानावर जाऊन तपासणी केली. शिवाय सोमवारीही दिवसभर शेकडो रुग्णांची तपासणी करून त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. सतत चालत राहिल्यामुळे आणि शरीराला जराही विश्रांती न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून, अनेक मोर्चेकर्‍यांना  अतिसाराची लागण झाल्याची माहिती डॉ. प्रमोद दाभाडे यांनी दिली.

मोर्चेकरी गावितांवर दोन तास शस्त्रक्रिया

ठाणे :

 दिंडोरीहून आलेल्या अमृत गावित या 55 वर्षीय शेतकर्‍याची प्रकृती इतकी खालावली की त्यांच्यावर पोटाची मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यांच्या आतड्याला छिद्र होते. या शस्त्रक्रियेसाठी नातेवाइकांची परवानगी आवश्यक असते,  मात्र गावित यांचे कोणीच नातेवाईक हजर नसल्याने कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना काय करावे सुचेना. अखेर बळीराजाला लवकर बरं करणे असा निश्चय कळवा हॉस्पिटलमधील अधिष्ठाता डॉ. संध्या खडसे आणि त्यांच्या टीमने घेतला आणि स्वतःच जबाबदारी स्वीकारून गावित यांच्यावर दोन तास शस्त्रक्रिया केली. त्यांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसून, याचेच मोठे समाधान कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या चेहर्‍यावर आहे. गावित पूर्णपणे स्वस्थ असून त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. मात्र काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार आहे. 

याशिवाय अनंत बैरागी, पांडू भोये, रामदास भोये, समाधान गवे, पिंटू गोस्वामी आणि अमृत गावित या सहा शेतकर्‍यांवरही साधे उपचार करून त्यांना पुन्हा मोर्चात पाठवण्यात आले असल्याची माहिती खडसे यांनी दिली. आपण कितीही पगार घेतला तरी अन्न पिकवणारा बळीराजा वाचला पाहिजे, एवढे मोठे अंतर पायी कापून आलेल्या बळीराजाला आपल्याकडून मदत झालीच पाहिजे, या भावनेतून मी आणि माझी सर्व टीम लागली. मी स्वतः शेतकरी असल्याने शेतकर्‍यांच्या वेदना काय असतात हे मला समजू शकतात, अशा भावना डॉ. संध्या खडसे यांनी व्यक्‍त केल्या. 

सरकारची महाजन शिष्टाई यशस्वी!

विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचा ‘लाँग मार्च’ मुंबईत थडकला आणि त्याने ऐन अधिवेशन काळातच सरकारवर प्रचंड दडपण आणले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला संदेश घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना रविवारी रात्रीच आंदोलकांच्या भेटीसाठी पाठवले. महाजन यांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा करून वातावरणातील तणाव काहीसा कमी केला. 

महाजन यांनी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि राज्याचे सरचिटणीस अजित नवले यांना विश्‍वासात घेऊन विधिमंडळाच्या संकुलात सोमवारी भेटीचे निमंत्रण दिले. सोमवारी बैठकीनंतर महाजन यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या न्याय्य असल्याचे कबूल केले. 200 किलोमीटरवरून आलेल्या शेतकरी आणि आदिवासी बांधवांना आणखी त्रास होऊ नये यासाठी सरकार काळजी घेईल. शेतकरी आणि आदिवासींसाठी असणार्‍या योजना राबवण्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या आहेत त्या आम्ही दूर करू. त्यासाठी संबंधित खात्याच्या सचिवांची बैठक बोलावली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांचा असंतोष काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी लेखी आश्‍वासन आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी ठरावीक मुदत दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे शेतकरी नेत्यांनी महाजन यांना निक्षून सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सहा मंत्र्यांची समिती गठित केली. त्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा समावेश आहे.