Tue, Oct 24, 2017 16:58
29°C
  Breaking News  

होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकरी सुकाणू समितीचे उद्या ‘चक्काजाम’

शेतकरी सुकाणू समितीचे उद्या ‘चक्काजाम’

Published On: Aug 13 2017 2:08AM | Last Updated: Aug 13 2017 1:41AM

बुकमार्क करा


मुंबई : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा न करणार्‍या मंत्र्यांना ध्वजवंदन करू देणार नाही, असा इशारा शेतकरी सुकाणू समितीने दिला आहेे. मंत्री सोडून कोणीही ध्वजवंदन करावे, त्याला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी दि.14 ऑगस्ट रोजी राज्यभर रास्तारोको आंदोलन करून चक्काजाम करण्यात येणार असल्याचे सुकाणू समितीचे नेते  आमदार बच्चू कडू,डॉ. अजित नवले व रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

एकाही शेतकर्‍यांला आजअखेर कर्जमाफी निळाली नसल्याचे सांगून ते म्हणाले की, आता सुकाणू समितीच कर्जमाफी मिळालेला शेतकरी दाखवा व हजार रुपये मिळवा असे जाहीर  करणार आहे. विरोधात असताना भाजपच्या नेत्यांनी कर्जमाफीच्या वारेमाप घोषणा केल्या होत्या. शेतमालाला हमीभाव देण्याची भाषा केली होती.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यातील काहीच घडले नाही.विधानसभेत व परिषदेत याबाबद आवाज उठविण्यात आला. पण सरकारने काहीच भूमिका स्पष्ट केली नसल्याने आंदोलनाचे हे  हत्यार उपसण्यात आल्याचे नेत्यांनी सांगितले. याचीही सरकारने दखल घेतली नाही तर सरकारला उग्र परिणाम भोगावे लागतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असेही ते म्हणाले. 

कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या रांगेत मरत आहेत. नोटाबंदी व पीक विम्याच्या रांगेत लोक मेले आता कर्जमाफीसाठी असलेल्या रांगांचा नंबर लागल्याचे सांगून त्यांनी केवळ जाचक अटींमुळे राज्यातील 40 टक्के शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले. सरकारने ऑनलाईनचा दुराग्रह धरला आहे. यातून शेतकर्‍यांची कोंडी केली जात असल्याचे ते म्हणाले. 

शेतकरी सुकाणू समितीने राज्यभर जनजागृती केली असून शेतकरी हैराण असल्याचे चित्र समोर आले आहे. तर विद्यार्थीही  संघटित झाले आहेत. दि. 14 ऑगस्ट रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तर दि. 15 ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्यात मंत्र्यांना ध्वजवंदन करू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सरपंचांपासून ते महापौरांपर्यंत सर्वांनीच ध्वजवंदनाचा मान हा शेतकर्‍यांना देऊन शेतकरी प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.