Tue, Jul 16, 2019 01:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किसान मोर्चा Live : सरकारसोबत चर्चा करु, पण....

किसान मोर्चा Live : सरकारसोबत चर्चा करु, पण....

Published On: Mar 11 2018 10:55AM | Last Updated: Mar 11 2018 3:54PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

नाशिक ते मुंबई असा मैलाचा प्रवास करुन मुंबईत दाखल झालेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. त्यांनी सरकारच्या शिष्टचार मंडळासोबत चर्चा करण्याचे निमंत्रण आंदोलनकर्त्यां नेत्यांना दिले आहे. आंदोलनकर्त्यांनी सरकारचे निमंत्रण स्वीकारले असून लेखी आश्वासन दिल्याशिवाय संघर्ष सुरुच राहणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शिष्टचारमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सकारात्मक तोडगा काढतील, असे महाजन यांनी म्हटले.     

विरोधी पक्ष आणि मित्रपक्ष शिवसेना यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजपकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांची भेट घेतली. आज रात्री कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याच्या हालचाली देखील सरकारकडून सुरु आहेत.    

सरकारविरोधातील संघर्षात काँग्रेसनेही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना आणि मनसेनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत असल्याचे स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमय्या मैदानात मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. किसान मोर्चाला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत.   

विविध मागण्यांसाठी बळीराजाने मुंबईची वाट धरली आहे. शनिवारी रात्री हा मोर्चा ठाण्यात पोहचला होता. सोमवारी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. कर्जमाफीसह इतर प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले आहेत. कॉम्रेड नेते अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि शेकाप आमदार जयंत पाटील या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत.   

लाईव्ह अपडेट्स-

* कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर रात्री आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याची शक्यता

* शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे महाजन यांना मान्य 

* शिष्टाचारमंडळासोबत बैठकीत मुख्यमंत्री सकारात्मक तोडगा काढतील असे आश्वासन   

* गिरीश महाजन यांनी किसान मोर्चातील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली

* सोमय्या मैदानावर राज ठाकरे शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत

* सरकार विरोधातील संघर्षात काँग्रेस शेतकऱ्यांसोबत- काँग्रेस राज्य प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण 

* काँग्रेसचाही किसान मोर्चाला पाठिंबा

* लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही   

* शिवसेना आमच्यासोबत आहे म्हणजे अर्धे सरकार आमच्यासोबत आहे - शेकाप आमदार जयंत पाटील 

* सरकारसोबत सत्तेत असलो तरी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे ते म्हणाले.

*ठाण्यातील मोर्चेकरांची सकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदें यांनी भेट घेतली.

 * ज्याप्रमाणे पाहुणचार केला त्याप्रमाणेच उद्याही शिवसेनेने आमच्यासोबत उभे रहावे - कॉ अजित नवले 

*नदीजोड प्रकल्पातून नाशिक, ठाण्याचे पाणी गुजरातला देण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, आमचं  पाणी दुष्काळी मराठवाड्याला  द्या, पण गुजरातला हे पाणी देण्याचा डाव आम्ही कधीही पूर्ण  होवू देणार नाही, अशी भुमिका अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी मांडली.  
 

 

 बंद करण्यात आलेले मार्ग

सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पुर्व द्रुतगती मार्गावरील मुलूंडच्या आनंदनगर टोलनाक्यापासून सायनच्या सोमय्या मैदानापर्यत सर्वप्रकारच्या अवजड व माल वाहतूक वाहनांचा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

पर्यायी मार्ग- 

सर्व प्रकारच्या अवडज आणि माल वाहतूक वाहने कळवा, विटावा, एरोली आणि वाशी खाडी पूलमार्गे वळविण्यात आली आहे. पुर्व द्रुतगती मार्गावरुन ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहने वाशी खाडी पूलमार्गे एरोली, विटावा, ठाणे अशी वळविण्यात आली आहेत.