Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणात शेतकर्‍याची हत्या

कल्याणात शेतकर्‍याची हत्या

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:00AMकल्याण/डोंबिवली : वार्ताहर

कल्याणजवळच्या मोहने गावात घराबाहेर झोपलेल्या एका 92 वर्षीय शेतकर्‍याची अज्ञातांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. महादेव जाधव असे या मृत शेतकर्‍याचे नाव असून ते आपल्या पत्नीसह यादवनगर येथील शेतातील घरात राहात होते. त्यांची पत्नी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या रात्री झोपेत असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. शेतकर्‍याच्या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशननजीक मोहने यादव नगर येथे शेतात बांधलेल्या घरात मनोहर जाधव हे आपल्या पत्नीसह राहात होते. त्यांची तीन मुले याच गावात राहतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास पत्नी घरात, तर महादेव हे व्हरांड्यात झोपले होते. अज्ञातांनी महादेव जाधव यांचा अत्यंत निर्घृण खून केला. त्यांचे डोळे फोडण्यात आले. तर त्यांच्या डोके, तोंड, कान, गळ्यावर वार करण्यात आले. बुधवारी सकाळी महादेव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळताच खडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटनेही घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी महादेव यांचा मुलगा हरिभाऊ जाधव (47) यांच्या जबानीवरून खडकपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवला. 

Tags : mumbai, Kalyan, Farmer murder, mumbai news,