होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धाडसी पाऊल; भेंडी, काकडीला पर्याय झेंडूची शेती

धाडसी पाऊल; भेंडी, काकडीला पर्याय झेंडूची शेती

Published On: Feb 17 2018 9:34AM | Last Updated: Feb 17 2018 9:34AMटाकीपठार : संतोष दवणे

लघुपाटबंधारे प्रकल्प असणार्‍या गावांत बारमाही शेती करणारे शेतकरी भात शेतीनंतर हिवाळा-उन्हाळ्याच्या मोसमात भेंडी, काकडी, वांगी, दुधी, घोसाळी, गवार इत्यादी नगदी पिके घेऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करतात. शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका शेतकर्‍याने मात्र झेंडूची शेती करत धाडसी पाऊल उचलले आहे.

शहापूर तालुक्यातील जांभे, डोळखांब, मुसई, वेहळोली या गावांशेजारी असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या क्षेत्रात बारमाही पाणी उपलब्ध होत असल्याने शेकडो शेतकरी काकडी व भेंडीचे मळे करतात. मात्र काकडी व भेंडीला चांगला भाव मिळाला नाही तर मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे वेहळोली येथील तरुण शेतकरी विठ्ठल निमसे यांनी परिसरात कुणीही न केलेला फुलशेतीचा प्रयोग करण्याचा साहसी निर्णय घेतला आणि त्यात त्यांना चांगले यशही मिळताना दिसत आहे. या सुशिक्षित बेरोजगार असणार्‍या तरुणाने पावणेदोन एकरमध्ये फुलशेती केली आहे. यासाठी त्याने आळेफाटा येथून कलकत्ता जातीची 8 हजार लाल झेंडूची व 2 हजार पिवळ्या झेंडूची तयार रोपे 3 रुपये दराने आणली. पावणेदोन एकर जमिनीत ही 10 हजार रोपे ट्रॅक्टरने मशागत करून सरी पद्धतीने गवत मारून लावण्यात आली. त्यांना नियमितपणे पाटाचे पाणी दिले. 40 दिवसांनी या झेंडूच्या रोपांना फुले आली असून आता उत्पन्न सुरू झाले आहे.

आतापर्यंत 40 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती विठ्ठल निमसे यांनी दिली. सध्या निमसे हे दरदिवशी पन्नास रुपये किलोच्या भावाने किन्हवली येथे किंवा गावात फुले विकत आहेत. आतापर्यंत 80 किलो झेंडूची फुले त्यांनी विक्री केली असून दहा किलो फुले खुडण्यास त्यांना केवळ अर्धा तास लागतो. याउलट काकडी किंवा भेंडी तोडणे खूपच त्रासाचे असते. घराजवळच्या शेतात ही शेती केली असल्याने घरगुती कुंपण केले असून जनावरांचाही उपद्रव होत नाही. या फुलशेतीसोबतच निमसे यांनी घरगुती वापरासाठी थोडासा भाजीपालाही लावला असून या फुलशेतीतून 3 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. ही फुलशेती पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी येत आहेत.

कमी मेहनतीत जास्त उत्पन्न देणारा माझा फुलशेतीचा प्रयोग यशस्वी होत आहे. त्यामुळे गावातील इतर शेतकरीही फुलशेती करण्याचा विचार करू लागले आहेत. - विठ्ठल निमसे, (शेतकरी)