Thu, Apr 25, 2019 11:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फरिदाला ओमानला पाठविणारा एजंट अटकेत!

फरिदाला ओमानला पाठविणारा एजंट अटकेत!

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 1:00AMअंबरनाथ : प्रतिनिधी

अंबरनाथ येथे राहणार्‍या फरिदा खान या महिलेला ओमानला पाठविणार्‍या व सुटकेसाठी त्याच्याकडून 40 हजार रुपये उकळणार्‍या एजंट इम्रानला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. इम्रानविरोधात फरिदाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच महिला आयोगानेही त्या संदर्भात कारवाईचे निर्देश दिल्याने एजंट इम्रानला पोलिसांनी अटक केली असून त्याला 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसी कारवाई आपल्यावर होऊ नये यासाठी एजंट इम्रानने फरिदाला 40 हजार रुपये परत केले आहेत. 

अंबरनाथ पश्‍चिम भागातील बुवापाडा या झोपडपट्टीसदृश परिसरात फरिदा अब्दुल अजीज खान (36) राहते. घराची परिस्थिती बेताचीच असल्याने तिने दुबईला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. एका एजंटमार्फत ती ओमान येथे नोकरीसाठी रवाना झाली खरी, मात्र ज्या ठिकाणी ती काम करीत होती तेथे तिला मरण यातना सहन कराव्या लागल्या. 20 ते 22 तास काम करूनही तिला सुकी रोटी खावी लागत होती. महिनाभर फरिदाने त्या ठिकाणी कसेबसे काम केल्यानंतर तिने आपल्या नवर्‍याशी संपर्क केला आणि तेथील परिस्थिती सांगितली. 

आपल्या बायकोसमोरील संकट दूर करून तिला पुन्हा भारतात आणण्यासाठी त्याने अंबरनाथ येथील एजंट इम्रानला 40 हजार रुपयेदेखील दिले. मात्र काहीच हालचाल होत नसल्याने फरिदाच्या पतीने संरक्षण मंत्रालय आणि महिला आयोगाची मदत घेतली आणि फरिदाची कशीबशी सुटका झाली. तरीदेखील फरिदाला दुबई येथील एजंटकडे दोन महिने राहावे लागले. म्हणजेच एकूण तीन महिने फरिदा संकटांशी झुंज देत होती. अखेर 1 मे रोजी ती भारतात परतली होती.