Sun, Aug 25, 2019 13:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फरिदाला चक्क पाण्याबरोबर खावी लागली रोटी!

फरिदाला चक्क पाण्याबरोबर खावी लागली रोटी!

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 2:04AMअंबरनाथ : राजेश जगताप 

परिस्थितीने ग्रासलेल्या फरिदाला दुबईत नोकरी करून घराला हातभार लावायचा होता.  एका एजंट करवी तिला ही संधी मिळाली खरी मात्र तिने घालवलेल्या तीन-साडेतीन महिन्यांत तिला आलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. एका भयावह स्वप्नाप्रमाणे तिची ही कथा आहे. जवळजवळ वीस ते बावीस तास काम करून मारही खावा लागला. जेवणाचेही प्रचंड हाल होत असल्याने फरिदा रोटी चोरून ठेवून भूक लागेल तेव्हा ती पाण्यासोबत खायची. मोठ्या प्रयत्नानंतर महिला आयोग, परराष्ट्र मंत्रालय यांच्या सहकार्यामुळे फरिदाची सुटका झाल्याने व पुन्हा घरच्यांची भेट झाल्याने तिचा आनंद गगनात न मावणारा आहे.

26 जानेवारी 2018 रोजी फरिदाला दुबईला पाठवण्यात आले. तेथे आठवडाभर राहिल्यानंतर तिला मस्कत येथील अहमद सेठकडे पाठवण्यात आले. 17 खोल्यांचा बंगला, आठ गाड्या, गार्डनचा भव्य परिसर असा सगळा घरकामाचा कारभार फरिदा एकटी सांभाळत होती. त्यामुळे झोपायला आणि जेवायलाही तिला फुरसत मिळत नव्हती. त्यात काम झाले नाही की मग सेठचा मार खावा लागत हेाता. कोणताही संपर्क नाही, ओळखीचे कोणी नाही त्यामुळे एखाद्या जेलमध्ये असल्याचा अनुभव तिला आला होता. एकदा असेच सेठने मारल्यामुळे फरिदाच्या तोंंडातून रक्‍त येऊ लागले. त्यामुळे मी येथे काम करणार नाही, मला पुन्हा भारतात जायचे आहे, असा तगादा फरिदाने लावला होता. मात्र, त्यामुळे तिला जास्तच मार खावा लागला. जाम आणि रोटी खावून एक-दोन तासही तिला आराम मिळत नव्हता, अशा परिस्थितीत फरिदाने वीस दिवस काढले. 

नेहमीच्या जाचाला कंटाळून तिला मस्कतला नेणारा एजंट आनसच्या ऑफीसमध्ये ती परत आली आणि मला काम करायचे नाही, मला पुन्हा भारतात जायचे आहे, असा तगादा तिने लावला. मात्र तरीही तीन महिने तिला आनसच्या ऑफीसमध्येच रहावे लागले. तेथेही एका रुममध्ये बर्‍याच महिला सोबत होत्या, त्यांचीही तिच परिस्थिती होती. एजंट आनसही त्यांना मारहाण करत असे. दरम्यान फरिदाचे पती अब्दुल याने महिला आयोग आणि सुषमा स्वराज यांना पत्रव्यवहार केल्याचा फायदा झाला आणि  अखेर तिला विमानाचे तिकीट काढून मस्कत एअरपोर्टवर सोडून देण्यात आले. त्यासाठीही आनसने 25 हजार रुपये घेतले होते. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर अखेर फरिदा मुंबईत आली. त्यासाठीही अंबरनाथचा एजंट इम्रानला फरिदाच्या पतीने 60 हजार रुपये दिले. त्यामुळे रिकाम्या हातानेच फरिदाला भारतात यावे लागले. या सगळया प्रकाराची तक्रार तिने अंबरनाथ पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र तिला केलेल्या कामाचे पैसे व एजंट इम्रानला  शिक्षा द्यायची आहे.