Sat, Apr 20, 2019 16:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फरसाण दुकानाच्या मालकाला कोठडी

फरसाण दुकानाच्या मालकाला कोठडी

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 1:24AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

साकीनाका येथील सूर्या फॅन्सी फूड (भानू फरसाण मार्ट) या दुकानाला लागलेल्या आगीत बारा कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असलेला दुकानाचा मालक रमेश वालजी भानुशाली याला सोमवारी रात्री उशिरा साकीनाका पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून ते चौघेही नेपाळ, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रमेश भानुशाली हे घाटकोपर येथील अमृतनगर परिसरात राहतात. दुर्घटनेतील मृतांमधील आठजणांची ओळख पटली होती. त्यापैकी शिवकुमार कौहर हा कामगार नेपाळचा रहिवासी आहे. भोला अर्जुन राजभर हा दिल्लीचा तर रामनरेश गिसाई गुप्ता आणि जितेंद्र छोटेलाल राजभर हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. शिवकुमार हा शंभर टक्के भाजला होता. त्यामुळे त्याची ओळख पटली नव्हती. 

अटकेनंतर रमेशला मंगळवारी पोलीस बंदोबस्तात अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलेे. पोलिसांच्या वतीने त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. रमेश भानुशालीने दुकानात अनधिकृत बांधकाम करताना पोटमाळा बांधला होता. याच पोटमाळ्यावर काही कामगार झोपत होते. आगीच्या वेळेस तिथे काही कामगार झोपले होते.  आगीमुळे हा पोटमाळा पडून त्यात काही कामगार गाडले गेले. त्यामुळे त्यांना आगीत बाहेर पडता आले नाही. दुकानात आगीसाठी आगप्रतिबंधक यंत्रणा नव्हती. आगीत  सिलेंडरचा स्फोट झाला होता. जप्त केलेले सिलेंडर घरगुती किंवा व्यावसायिक होते हे अद्याप निष्पन्न झाले नाही. कोणत्याही प्रकारचे परवाने नसताना फरसाण बनवण्याचे काम सुरु होते. मनपा, आरोग्य विभागासह इतर शासकीय यंत्रणेकडून तशी परवानगी घेण्यात आली नव्हती. कारखान्यात डिझेलचा वापर भट्टीसाठी होत होता. मात्र, डिझेल भट्टीसाठीही परवाने घेण्यात आले नव्हते असे पोलिसांनी सांगितले. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर अंधेरी कोर्टाने रमेश भानुशालीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.